नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कारमधील एअरबॅग वाढविण्यासंदर्भात बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. आधीच्या बातम्यानूसार ऑक्टोबर महिन्यांपासून देशात विक्री होणाऱ्या सर्व कारना 6 एअरबॅग ( Airbags ) बंधनकारक करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतू रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात एका कार्यक्रमात वेगळीच माहिती दिली आहे. देशात या वर्षाच्या सुरुवातीला नवीन क्रॅश टेस्ट नियमांना लागू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता वेगळा निर्णय घेतला आहे.
रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच यात मृत्यूची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे कारमध्ये सहा एअर बॅग अनिर्वाय करण्यासंदर्भात चर्चेला तोंड फुटले होते. ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( ACMC ) च्या वार्षिक बैठकी दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारसाठी 6 एअरबॅगचा नियम बंधनकारक असणार नाही. देशात अनेक कार कंपन्या यापूर्वीच सहा एअरबॅगची सुविधा देत आहेत. या कार कंपन्या त्याची जाहीरात देखील करीत आहेत. अशाच कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक करण्याच्या नियमाची आवश्यकता नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की देशातील ऑटो सेक्टर वेगाने वाढत आहे. भारताने अलीकडेच या बाबतीत जपानलाही मागे टाकले आहे. आता भारत जगातील तिसरा सगळ्यात मोठा ऑटो बाजार बनला आहे. अशा कार कंपन्यात नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. वाहन मालक देखील कार विकत घेताना नवीन टेक्नॉलॉजी आणि फिचर्स पाहून आपली निवड करीत आहेत. अशात काही कार कंपन्या ग्राहकांना आधीपासूनच सहा एअरबॅगची सुविधा देत आहेत. अशात ज्यांना स्पर्धेत टीकायचे आहे ते आपोआपच सहा एअरबॅग देतील. त्यामुळे आम्हाला सहा एअरबॅग अनिर्वाय करण्याचा निर्णय घेण्याची काही गरज नसल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2023 पासून देशात सहा एअरबॅग बंधनकारक करण्याचा नियम लागू करण्याची घोषणा केली होती. देशात सर्वात जास्त छोट्या कारची खरेदी मध्यमवर्गीयांकडून केली जाते तसेच लो बजेट गाड्यांची मागणी जादा आहे. त्यावेळी त्यांनी वाहन निर्माण कंपन्या केवळ जादा किंमतीच्या प्रिमियम कारमध्येच सहा अथवा आठ एअरबॅगची सुविधा देत आहेत अशी टीका गडकरी यांनी केली होती.