आठ दिवस झाले मजूर अडकलेलेच, नितीन गडकरी यांनी दिली भेट, कधी होणार सुटका ?

| Updated on: Nov 19, 2023 | 9:59 PM

सिलक्यारा टनेल दुर्घटनेतील मजूरांशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांना बोलायला दिले जात आहे. पाईपमधून अन्न आणि पाणी पुरविले जात आहे. सरकार मजूरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बोगद्यात अडकलेले मजूर बहुतांशी उत्तरप्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील आहेत.

आठ दिवस झाले मजूर अडकलेलेच, नितीन गडकरी यांनी दिली भेट, कधी होणार सुटका ?
NITIN GADKARI
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

उत्तराखंड | 19 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगद्याचे काम सुरु असताना भूस्खलन होऊन गेल्या एक आठवड्यापासून अडकलेल्या 41 मजूरांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी मजूरांची सुटका करण्याच्या कामाची पाहणी केली. जर ऑगर मशिन्स व्यवस्थित कार्यरत राहील्या तर मजूरांची दोन ते अडीच दिवसात सुटका होईल असे म्हटले जात आहे. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या वरुनही ड्रील करण्याचे काम सुरु आहे.

या ऑपरेशनचा पहिली प्राथमिकता पिडीतांना जीवंत ठेवणे आहे. सीमा रस्ते संघटन ( बीआरओ ) आणि भारतीय लष्कराची बांधकाम शाखा मजूरांना बाहेर काढण्यासाठी ऊर्ध्व भागातून ड्रीलिंग करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आधी 40 मजूर असल्याचे म्हटले जात होते. आता मात्र 41 मजूर अडकल्याचे उघड झाले आहे.

दिल्लीहून आणलेली उच्च क्षमतेची मशिन 22 मीटरच्या पुढे ड्रील करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर इतर पर्याय वापरले जात आहेत. मजूरांच्या सुटकेसाठी निरनिराळे पर्याय वापरले जात आहेत. ढीगारा हटविण्यासाठी मोठे उत्खनन करणे सुरु आहे. ढीगाऱ्यात ड्रीलिंग करणे आणि मजूरांना आत पाईप टाकणे सुरु आहे.

नातेवाईकांशी बोलायला दिले जात आहे

सिलक्यारा टनेल दुर्घटनेतील मजूरांशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांना बोलायला दिले जात आहे. पाईपमधून अन्न आणि पाणी पुरविले जात आहे. सरकार मजूरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बोगद्यात अडकलेले मजूर बहुतांशी उत्तरप्रदेशातील असल्याने येथे उत्तर प्रदेशातील अधिकारी देखील पोहचले आहेत. ते मजूरांच्या नातेवाईकांना मजूरांशी संपर्क होण्यासाठी मदत करीत आहेत.

विटामिन्स आणि सुकामेवा पुरवला जात आहे

या मजूरांना मल्टी विटामिन्स, एण्टीडिप्रेसेंट आणि सुका मेवा पाईपमधून पुरविला जात आहे. सुदैवाने आता वीज उपलब्ध असल्याने उजेड आहे. तसेच पाईपलाईन पाण्याचा देखील पुरवठा सुरु आहे. या बोगद्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील मजूर अडकलेले आहेत. ऑगर मशिनच्या मदतीने 900 मिमीचा पाईप आत टाकला जात आहे. 22 मीटरपर्यंत खोदकाम झाले आहे. बोगद्याचे छत आणि मधल्या जागेत निरीक्षणासाठी रोबोटची मदत घेतली जात आहे.