लक्षद्वीप : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यातच नाहीतर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी पोवाड्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लक्षद्वीपमधील बंगाराम बेटावर महाराजांना विनम्र अभिवाद केलं. रामदास आठवले परिवारासह बंगाराम बेटावर समुद्र सफारीचा आनंद घेतला.
देशाच्या समुद्रसीमांचे संरक्षण करण्यासाठी समुद्रदुर्ग उभारण्याची पहिली संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. देशात पाहिले सागरी आरमार उभारणारे, दूरदृष्टीचे असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत, असं म्हणत रामदास आठवले यांनी महाराजांना विनम्र अभिवादन केलं.
लक्षद्वीप हे अत्यंत सुंदर बेट आहे. मालदीवपेक्षा अनेक पटीने लक्षद्वीप सुंदर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्या नुसार आपण मालदीवचा दौरा रद्द करून लक्षद्वीप सहकुटुंब भेट दिली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीप या निसर्गरम्य सुंदर बेटाला आवर्जुन भेट द्यावी. भारतीय व्यावसायिकांनी हॉटेल इंडस्ट्रीने लक्षद्वीप कडे लक्ष दिले पाहिजे. नवीन हॉटेल पर्यटकांना आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे नवीन हॉटेल उभारावीत असं आवाहन, रामदास आठवले यांनी केलं.
दरम्यान, लक्षद्वीपमध्ये उद्या म्हणजेच मंगळवारी रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात येणार आहे. उद्या दिव्यांगजनांसाठी एडीप कॅम्प द्वारे सहाय्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.