लखनौ, उप्रः असं म्हणतात की कर्माची फळं प्रत्येक माणसाला भोगावी लागतात. फक्त हे कोणत्या स्वरुपात, किती प्रमाणात असतात आणि कधी भोगावे लागतील, हे सांगणं कठीण असतं. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतही असाच प्रकार समोर आला. कधी काळी केलेल्या कर्माची फळं 90 व्या वर्षी भोगावी लागतायत. वयाचा मान राखून ही शिक्षा कमी करण्यात आली. मात्र लखनौच्या स्पेशल सीबीआय कोर्टाने (CBI Court) ३२ वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा (Punishment) ठोठावली. आता वृद्धापकाळी या व्यक्तीला १ वर्ष तुरुंगात जावं लागणार आहे. तसंच 15 हजार रुपयांचा दंडही त्यांना भरावा लागणार आहे.
उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. 32 वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याने 100 रुपयांची लाच घेतली होती. सध्या त्याचं वय 89 वर्ष आहे. वयाचा विचार करून कोर्टाने सदर रेल्वे कर्मचाऱ्याला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दोषीने ही शिक्षा कमी करण्याची विनंतीदेखील केली. मात्र सीबीआयच्या जजनी ही विनंती फेटाळली. असे केल्याने समाजात चुकीचा संदेशदेखील गेला असता.
उत्तर प्रदेशातील रिटायर्ड लोको ड्रायव्हर राम कुमार तिवारी यांनी 1991 मध्ये सीबीआयकडे एफआयआर दाखल केलं होतं. तिवारी यांच्या पेंशन मोजणीच्या उद्देशाने मेडिकल टेस्ट आवश्यक होती. मात्र राम नारायण वर्मा यांनी हे काम करण्यासाठी 150 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर त्यांनी १०० रुपयेदेखील मागितले. सीबीआयने वर्मा यांनी लाचेच्या रकमेसहित रंगेहाथ पकडलं होतं.
या संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर सीबीआयने वर्मा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. कोर्टाने 30 नोव्हेंबर 2022 रोजी वर्मा यांच्यावर आरोप निश्चित केले.
सीबीआय कोर्टाने नुकतीच या खटल्यात सुनावणी केली. राम नारायण वर्मा यांना 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण 32 वर्षांपूर्वीचं आहे. यापूर्वीही वर्मा यांनी जामीनावर सुटण्यापूर्वी 2 दिवसांची शिक्षा भोगली आहे.