लखनऊ : आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची (CM yogi aadityanath) दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे योगी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी 4 वाजता लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. शपथविधीला दिग्गजांसह साधु-संतांची उपस्थिती असणार आहे. तर या सोहळ्यासाठी अनेक मान्यवारांनाही आमंत्रित करण्यात आलंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संत, महंत, उद्योजकांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय या सोहळ्याला भाजप सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित असतील. उत्तर प्रदेशातील योगींच्या भव्य शपथविधीची चर्चा अवघ्या देशात सुरू आहे.
योगी आदित्यनाथ यांनी सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी फोन करून समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपा प्रमुख मायावती यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे. याशिवाय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, आरएलडी प्रमुख जयंत चौधरी आणि अखिलेश यादव हे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अयोध्या, मधुरा आणि काशीसह देशभरातील 50 हून अधिक संतांना योगी आदित्यनाथ यांनी आमंत्रित केलं आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255, त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला 12 आणि निषाद पक्षाला सहा जागा मिळाल्या आहेत.
विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत भाषण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशात पुन्हा विजय मिळवून भाजपने इतिहास रचला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्यात विकासाची पायाभरणी केली असून पुढील पाच वर्षांत उत्तर प्रदेशाला हरवलेलं वैभव पुन्हा मिळवून देण्याचे काम माझे सरकार करणार असल्याचा विश्वास योगींनी यावेळी दिला. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. येथलं कुशासन जाऊन सुशासन आलंच आहे. आता आपल्याला पुढे जायचे आहे. सुशासनाला आणखी बळकटी द्यायची आहे, असेही योगी म्हणाले.
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याने शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना लखनऊमध्ये एनकाऊंटरची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे शपथविधीची चर्चा आहे तर दुसरीकडे एनकाऊंटरची.
इतर बातम्या