लखनऊ : आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची (CM yogi aadityanath) दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे योगी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी 4 वाजता लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये 48 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शपथ घेण्यापूर्ण अनेक आमदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी पोहचल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संत, महंत, उद्योजकांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय या सोहळ्याला भाजप सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित असतील. उत्तर प्रदेशातील योगींच्या भव्य शपथविधीची चर्चा अवघ्या देशात सुरू आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या नव्या सरकारमध्ये जवळपास 48 मंत्री शपथ घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यात 7 ते 8 महिला मंत्र्यांचाही समावेश आहे. आता असं असलं तरी अ्द्यापही मंत्र्यांचे नाव नेमकी कळू शकलेली नाही. मात्र, यात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचीही माहिती आहे. अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याची भव्य तयारी करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मंत्रीही शपथ घेणार आहेत. यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केशव प्रसाद मौर्य, दयाशंकर सिंह आणि राजेश्वर सिंह आज मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. बलियामधून पहिल्यांदाच विजयी झालेले दयाशंकर सिंह यांचेही नाव मंत्र्यांच्या यादीत आहे. त्यांच्या पत्नी स्वाती सिंह मागील सरकारमध्ये मंत्री होत्या, यावेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले. तर स्वतंत्र देव सिंग, एके शर्मा आणि बेबीरानी मौर्य यांची नावेही चर्चेत आहेत. एवढेच नाही तर 3 माजी आयपीएस-आयएएस अधिकाऱ्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अयोध्या, मधुरा आणि काशीसह देशभरातील 50 हून अधिक संतांना योगी आदित्यनाथ यांनी आमंत्रित केलं आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255, त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला 12 आणि निषाद पक्षाला सहा जागा मिळाल्या आहेत.
इतर बातम्या