नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आपला एक वादग्रस्त निर्णय मागे घेतला आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी गाईला मिठी मारा, असं परिपत्रक केंद्र सरकारनं काढलं होतं. या निर्णयाची नेटकऱ्यांकडून जोरदार खिल्ली उडवण्यात आली. अनेक मीम्स तयार करण्यात आले. समाजमाध्यमांमध्ये टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतला. अखेर केंद्र सरकारने कमीपणा घेत आणि खिल्ली उडाल्यानंतर निर्णय मागे घेतला आहे.
व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला नव्हे. तर गायीला मिठी मारा असं अजब परिपत्रक केंद्र सरकारनं काढलं. पण तेच परिपत्रक अवघ्या दोनच दिवसात मागे घेण्याची वेळ केंद्र सरकारवर आली. केंद्र सरकारनं काढलेल्या या आदेशावर सोशल मिडीयात तुफान मीम्स तयार झाले. एका भाजप नेत्याला गायीनं लाथ मारल्याचा व्हीडिओ विरोधकांनी ट्विटरवर व्हायरल केला.
सरकारच्या आदेशानंतर आणखीही बरेच व्हिडीओ व्हायरल झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनीही यावर व्यंगचित्र काढलं. तेच व्यंगचित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवर शेअर केलं. इतरही अनेक मीम्स सोशल मिडीयात व्हायरल झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबद्दल केंद्र सरकारला चिमटे काढले.
आता त्यांनी सांगितलं की गाईवर प्रेम करा. आता गाईवर प्रेम करायला काही हरकत नाही. प्रश्न उभा राहतो की गाय आणायची कुठून. हजारोंनी तरुण तरुणी बाहेर पडतात. गाय शोधणार कुठून. गाय मिळणार कुठे? शासन कुठे गायी उभ्या करणार आहेत का? आम्ही गडकरी रंगायतनच्या इथे 4 गायी उभ्या करणार. ज्यांना मिठ्या मारायच्या आहेत त्यांनी मिठ्या माराव्या. परत गाईला मिठी मारताना अडचण..पुढनं मारली तर शिंगं मारणार. मागून मारली तर लाथ मारणार. पोट एवढं मोठं आहे की मिठी मारता येत नाही. प्रॅक्टिकली दाखवावं लागेल ना. मिठी कशी मारायची. सरकारनं याच्यासाठी काय केलंय का. टीव्हीवर वगैरे काय दाखवणार आहेत का. मिठी कशी मारायची, असे विविध प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यानंर अखेर निर्ण मागे घेण्यात आला.