मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : देशातील पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत एक्सप्रेसमुळे ( Vande Bharat Express ) आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल झुकला आहे. त्यामुळे विमान प्रवासी देखील वंदेभारत एक्सप्रेसकडे आकर्षित झाले आहेत. सध्या देशाच्या 34 मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. मध्य रेल्वेवर चार मार्गांवर वंदेभारत सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) माहीतीनूसार वंदेभारतच्या आगमनामुळे एअर ट्रॅफीकमध्ये आणि विमानाच्या तिकीटदरात मोठी घसरण झाली आहे.
मध्य रेल्वेच्या आकडेवारीनूसार मुंबईतून सुरु झालेल्या वंदेभारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांचे वय सरासरी 31 ते 45 दरम्यान आहे. त्यानंतर 15 ते 30 वयोगटातील प्रवाशांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या चार मार्गांवर वंदेभारत सुरु आहे. मुंबई सीएसएमटी ते शिर्डी, गोवा ( मडगांव ), सोलापूर अशा मध्य रेल्वेवर तीन वंदेभारत मुंबईतून सुटतात त्यातील 15 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबरचा प्रवाशांचा डेटा जमा केला आहे. या दरम्यान, एकूण 85 हजार 600 पुरुषांनी, 26 तृतीयपंथी आणि 838 महिला प्रवाशांनी प्रवास केल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
वंदेभारतच्या लॉंचिंगनंतर असा अंदाज आहे की हवाई वाहतूकीत 10 ते 20 टक्के आणि विमानाच्या तिकीट दरात 20 ते 30 टक्के घसरण झाली असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी म्हटले आहे. रेल्वे वंदेभारतची प्रसिध्दी आणि प्रवासी संख्या वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. देशाच्या 34 मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेस सुरु आहे.
वंदेभारत एक्सप्रेस सध्या चेअरकारने चालविल्या जात आहेत. त्यामुळे झोपून प्रवास करणे शक्य नाही. लवकरच वंदेभारतचा स्लिपर कोच येण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदेभारतच्या स्लिपर कोचबाबत काही फोटो अलिकडेच पोस्ट केले होते. यावेळी कॉन्सेप्ट ट्रेन – वंदेभारत ( स्लिपर व्हर्जन ) नवीन वर्षांच्या 2024 सुरुवातीला दाखल होऊ शकते असे त्यांनी म्हटले होते.
वंदेभारतच्या सध्या सुरु असलेल्या ट्रेन चेअरकारच्या असल्याने केवळ बसून प्रवास करता येतो. लांबच्या रात्रीच्या प्रवासासाठी झोपून प्रवास करता येणारा वंदेभारतचा स्लिपर कोच मार्च 2024 पर्यंत येण्याची शक्यता आहे. यात स्लिपर कोचमध्ये 857 बर्थ असल्याची शक्यता आहे. या नविन सुविधा असण्याची शक्यता आहे. चेन्नईतील आयसीएफ रेल कोच फॅक्टरीत वंदेभारतच्या स्लिपर कोचचे काम सध्या सुरु आहे.