Vande Bharat Metro कधी सुरु होणार असा प्रश्न देशातील कोट्यवधी प्रवाशांना पडला आहे. देशातील अनेक मेट्रो शहरात आणि निम्न शहरात मेट्रोचे जाळे दिवसागणिक विस्तारत आहे. त्यातच वंदे भारत ट्रेन देशात लोकप्रिय ठरली आहे. जलद आणि खिशाला परवडणाऱ्या या रेल्वेने प्रवाशांची मनं जिंकली आहेत. आता वंदे भारत मेट्रोची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लूक पण समोर आला आहे. कशी आहे ही मेट्रो, काय आहेत तिची वैशिष्ट्ये?
कुठे तयार होत आहे मेट्रो?
वंदे भारत मेट्रोविषयी जनतेत उत्सुकता आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे कॉम्पॅक्ट व्हर्झन पंजाबमधील कपूरथला येथली रेल्वे कोच फॅक्टरीत सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वंदे भारत मेट्रोचा ट्रायल रन जुलै 2024 पासून सुरु होणार आहे. PTI या वृत्तसंस्थेनुसार, अत्यंत वाजवी किंमतीत प्रवाशांना आरामदायक सुविधा तर मिळतीलच, पण जलद प्रवासाच अनुभव घेता येईल. ही मेट्रो इंटर सिटी आणि इंट्रा सिटींमध्ये धावणार आहे. जुलै 2024 पासून वंदे भारत मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. लवकरात लवकर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे.
काय आहे वंदे मेट्रो?
वंदे मेट्रो, सध्या लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे कॉम्पॅक्ट मॉडल आहे. प्रत्येक दिवशी एकाच शहरात अथवा दोन शहरात लागणारा वेळ कमी करण्यासाठी ही मेट्रो उपयोगात येणार आहे. त्यासाठी तिचे खास डिझाईन तयार करण्यात आले आहे. ही मेट्रो ताशी 130 किलोमीटर वेगाने धावू शकते. मेट्रो नेटवर्क देशातील 100-125 किलोमीटर अंतरावरील जवळपास 124 शहरांना कनेक्ट करणार आहे.
कशी असेल मेट्रो?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोमध्ये युनिक कोच कॉन्फिगरेशन आहे. चार कोच एका युनिटसारखे काम करतील. एक मेट्रो ट्रेनमध्ये कमीत कमी 12 कोच असतील. या 12 कोचसह वंदे मेट्रोची सुरुवात होईल. प्रवाशांचा प्रतिसाद, गर्दी आणि मागणी पाहून हे 16 कोचपर्यंत ही संख्या वाढविण्यात येऊ शकते. ही मेट्रो कमी कालावधीत जास्त अंतर कापणार आहे. आता ट्रायल रनमध्ये वंदे भारत मेट्रोचा दमखम दिसून येईल. त्यानंतर ही मेट्रो देशभरात सुरु करण्यात येणार आहे.