नवी दिल्ली : गोरखपूरहून लखनऊ येथे येणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसने ( Vande Bharat Express ) अयोध्येजवळ सहा बकऱ्यांना उडविल्याच्या रागातून पितापूत्रांनी वंदेभारतवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेत वेगवेगळ्या बोगीचे चार खिडक्यांच्या काचा तटल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. याआधीही वंदेभारतवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच वंदेभारतने गुरांना उडविल्याच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान,या प्रकरणात पिता-पुत्रांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जुलै रोजी उत्तरप्रदेशच्या गोरखपूर स्थानकातून गोरखपूर लखनऊ या वंदेभारतला हिरवा झेंडा दाखविला होता. या वंदेभारत एक्सप्रेसने सोहावल स्थानकाजवळ 9 जुलै रोजी सहा बकऱ्यांना उडविले होते. त्यामुळे संतापलेल्या मुन्नू पासवान आणि त्याच्या दोन मुलांनी अजय आणि विजय यांनी रागाच्या भरात वंदेभारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याची माहीती आरपीएफने दिली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तिचा शुभारंभ केला होता. उत्तरप्रदेशला मिळालेली ही दुसरी वंदेभारत एक्सप्रेस आहे. गोरखपूर – लखनऊ वंदेभारत वंदेभारत ट्रेन ( ट्रेन क्र.22549 ) गोरखपूरहून सकाळी 6.05 वाजता सुटते आणि सहजनवा, खलीलाबाद, बभनान, मनकापूर, अयोध्या आणि बाराबंकी वरुन लखनऊ जंक्शनला सकाळी 10.20 वाजता पोहचते. ही ट्रेन 299 किमीचे अंतर कापते. या ट्रेनच्या चेअरकारचा दर 1005 रुपये तर एक्झुकेटिव्ह क्लासचा दर 1755 रुपये इतका आहे. यात कॅटरिंग चार्ज, आरक्षण चार्ज , सुपरफास्ट चार्जचा तसचे जीएसटीचा देखील समावेश आहे.
गोरखपूरहून लखनऊला जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसवर दगडफेक करणाऱ्या मुन्नु पासवान आणि त्याच्या मुलांची चौकशी केली जात आहे. या दगडफेकीत कोणताही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. दगडफेकीने वंदेभारतच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. अचानक झालेल्या या दगडफेकीने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. आणि ट्रेनमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते.