वंदेभारत एक्सप्रेसचे भाडे कमी होणार ? रेल्वे घेतेय भाड्याचा आढावा

| Updated on: Jul 06, 2023 | 2:13 PM

वंदेभारत पेक्षा रस्ते मार्गाचे बसचे किंवा त्याच मार्गावरील अन्य ट्रेनचे भाडे कमी असेल शिवाय वंदेभारतने फारसा वेळ वाचत नसेल तर प्रवासी वंदेभारतला प्राधान्य देणार नाहीत अशी रेल्वेला भीती आहे.

वंदेभारत एक्सप्रेसचे भाडे कमी होणार ? रेल्वे घेतेय भाड्याचा आढावा
Vande_Bharat_Express
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : देशभरातील 24 राज्यात आलिशान वंदेभारत एक्सप्रेसच्या ( Vande Bharat Express ) सुरु झाल्या असून देशभरात वंदेभारतच्या एकूण 46 फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहे. महाराष्ट्राला एकूण पाच वंदेभारत मिळाल्या आहेत. अलिकडेच सुरु झालेल्या सीएसएमटी ते गोवा ( मडगाव ) वंदेभारत ( Mumbai – Madgaon Vande Bharat ) सुरु करण्यात आली आहे. परंतू काही वंदेभारतना हवे तसे प्रवासी मिळत नसल्याने या वंदेभारत एक्सप्रेसच्या तिकीट दराचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती.

वंदेभारत एक्सप्रेस बहुतांश मार्गावर चांगल्या प्रवासी क्षमतेने धावत असली तरी काही मार्गावर वंदेभारतला म्हणावे तसे प्रवासी मिळत नसल्याने त्यांच्या भाड्याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. या वंदेभारत शॉर्ट रुटवर धावणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याचे भाडे कमी करण्याची योजना आहे. इंदूर-भोपाळ-जबलपूर, नागपूर-बिलासपूर आणि काही आणखी मार्गावरील वंदेभारतच्या भाड्याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे.

इंदूर-भोपाळ वंदेभारतला तीन तास लागत असून तिला जूनमध्ये केवळ 29 टक्के प्रवासी भारमान लाभले आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी 21 टक्के भारमान लाभले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच नागपूर- बिलासपूर वंदेभारतला ( प्रवासाचा वेळ 5 तास 30 मिनिटे ) 55
टक्के भारमान आणि भोपाळ-जबलपूर वंदेभारतला ( साडे चार तास ) केवळ 32 टक्के भारमान लाभल्याने या दोन ट्रेनच्या भाड्यात कपात करण्याची योजना आहे.

किती आहे जादा भाडे

इंदूर-भोपाळ वंदेभारतचे एसी चेअरकारचे तिकीट 950 रुपये आणि एक्झुकेटीव्ह चेअरकारचे भाडे 1,525 रुपये आहे. तसेच नागपूर-बिलासपूर वंदेभारत एसी चेअरकारचे तिकीट 1,075 रुपये आणि एक्झुकेटीव्ह चेअरकारचे भाडे 2,045 रुपये आहे. तर भोपाळ ते जबलपूर वंदेभारतचे भाडे एसी चेअर कारचे भाडे 1,055 रुपये आणि एक्झुकेटीव्ह चेअरकारचे भाडे 1,880 इतके आहे तर परतीच्या प्रवासाला ते वेगळे असून एसी चेअरकारचे 955 रु. तर एक्झुकेटीव्ह चेअरकारचे 1790 रुपये इतके आहे.

रेल्वेला भीती वाटतेय…

एखाद्या रुटवरील वंदेभारत पेक्षा रस्ते मार्गाचे बसचे किंवा त्याच मार्गावरील अन्य ट्रेनचे भाडे कमी असेल शिवाय वंदेभारतने फारसा वेळ वाचत नसेल तर प्रवासी वंदेभारतला प्राधान्य देणार नाहीत अशी रेल्वेला भीती आहे. त्यामुळे तीन ते चार तासांचा प्रवास असणाऱ्या वंदेभारतचे जर भाडे कमी केले तर त्याला अधिक प्रतिसाद मिळेल असे म्हटले आहे. बहुतांश ट्रेन शंभर टक्के भारमानाने धावत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतू काही मोजक्या ट्रेनना भारमान कमी आहे.