मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु होत आहे. अशावेळी राष्ट्रपतीपदाची निवडणुकही (Presidential Election) 18 जुलैला होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर लगेच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही जाहीर झालीय. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (Vice Presidential Election) पार पडणार आहे, तशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) राष्ट्रपती निवडणुकीसोबत उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही पार पडणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचो पदसिद्ध अध्यक्ष असतात. निवडणुकीवेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. संसदेतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.
Election to the Office of the Vice President to be held on 6th August 2022.
— ANI (@ANI) June 29, 2022
देशात 1952 मध्ये पहिल्यांदा उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती म्हणून दोन टर्म त्यांचा कार्यकाळ राहिला. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळही 5 वर्षांसाठी असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त होतं.
भारतात उपराष्ट्रपती राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. संविधानामधील 63व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग किंवा अन्य कारणांमुळे राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात. तसंच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतींवर आहे.
भारतीय राजपत्रात 15 जून, 2022 प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे, राष्ट्रपती निवडणूक, 2022 साठी खालील वेळापत्रक निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे, त्यानुसार
>> 29 जून 2022, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
>> 30 जून 2022, उमेदवारी अर्जांची छाननी
>> 2 जुलै 2022, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
>> 18 जुलै 2022, आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल
आयोगाने 13 जून, 2012 रोजी आणखी एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांची 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली. तर, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) मुकुल पांडे आणि राज्यसभा सचिवालयातील मुख्य दक्षता अधिकारी तसेच संयुक्त सचिव सुरेंद्र कुमार त्रिपाठी यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.