VIDEO : देशात पहिल्यांदाच धावली नदीखालून मेट्रो, कुठे झाली अंडर वॉटर मेट्रो ट्रायल

| Updated on: Apr 13, 2023 | 5:19 PM

भारतीय रेल्वे इंजिनिअरनी तंत्रज्ञानाची अक्षरश: कमाल केली. देशात पहिली नदीखालील मेट्रो धावली, तिचा व्हिडीओ आज समाजमाध्यमात तूफान व्हायरल झाला आहे.

VIDEO :  देशात पहिल्यांदाच धावली नदीखालून मेट्रो, कुठे झाली अंडर वॉटर मेट्रो ट्रायल
kolkata under river metro
Follow us on

कोलकाता : भारतीय इंजिनिअर जगात कोणापेक्षाही कमी नाहीत हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. देशात प्रथमच रेल्वे इंजिनिअरनी पाण्याखालील मेट्रोची यशस्वी चाचणी घेतली आहे. कोलकाताच्या हावडा मैदान ते एक्स्प्लनेड अशी पाण्याखालील मेट्रोची ट्रायल रन आज घेण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन यावा अशी घटना भारताच्या रेल्वे इतिहासात प्रथमच घडली आहे.

कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. देशात प्रथमच नदीच्या पाण्याच्या खालील बोगद्यातून मेट्रो ट्रेन धावली आहे. हावडा आणि एक्स्प्लनेड दरम्यान नियमित चाचण्या लवकरच सुरू करण्यात येतील. कोलकाता मेट्रोचे जनरल मॅनेजर पी.उदय कुमार रेड्डीस यांनी हा कोलकाताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असल्याचे ट्वीटरवर पोस्ट करताना म्हटले आहे.

देशात प्रथम कोलकातामध्येच 24 ऑक्टोबर 1984  मध्ये 3.4 किलोमीटर अंतरावर देशातील पहिली मेट्रो धावली होती. आज कोलकातात देशातील पहीली पाण्याखालील मेट्रो धावली. नवा इतिहास घडला.

 

प्रत्येकासाठीच हा क्षण उत्सवासारखा आहे असे सांगत पी. उदय कुमार रेड्डी पुढे म्हणाले की, हावडा आणि एक्स्प्लडनेड स्टेशन दरम्यान मेट्रोच्या चाचण्या पुढील पाच ते सात महिने चालतील त्यानंतर येथे प्रवाशांसाठी नियमित फेऱ्या सुरू करण्यात येतील.

फर्स्ट अंडर वॉटर मेट्रोची वैशिष्ट्ये –

1 ) नदी पात्रापासून 13  मीटर आत तर जमिनीच्या किनाऱ्यापासून ( ग्राऊंड लेव्हल ) तब्बल 33 मीटर अंतरावर पहिल्या अंडर वॉटर मेट्रो धावणार आहे.

2 ) या मेट्रो मार्गावर एकूण चार स्थानके असणार आहे. त्यांची नावे एक्स्प्लनेड, महाकरण, हावडा आणि हावडा मैदान. हा संपू्र्ण बोगदा संपण्यास केवळ 45 सेंकद लागणार आहेत.

3) कोलकाताचा ईस्ट – वेस्ट मेट्रो कॉरीडॉरवर 520 मीटरचा हा मेट्रो टनेल आहे. त्याचा स्पॅन साल्ट लेक सेक्टर – 5 ते शहराचे आयटी सेक्टर पासून इस्ट ते वेस्ट कोलकाता येथील हावडा मैदानपर्यतचा भाग जोडला जाणार आहे.

4) हावडा आणि सिल्दाह हा भागाला रस्ते मार्गाने जाण्यासाठी दीड तास लागतो. कोलकाता मेट्रोने हे अंतर आता 40 मिनिटात कापता येईल.

5) ब्रॅबोर्न रोड हा परिसर अतिशय वर्दळीचा असून येथे शतकाहून जुन्या इमारती आणि घरे आहेत. त्यांना बांधकाम दरम्यान तात्पुरता निवारा देण्यात आला होता. हावडा मैदान ते एक्स्प्लनेड या अंतरासाठी बोगदा खणणे खूपच किचकट काम होते.

6 ) बाऊबाजार येथील मदन बाजार लेनमधील काही 12 घरांना तडेही गेले होते.