Vidya Chavan : शरद पवारांनी नाही तर देवेंद्र फडणवीसांनी कटकारस्थानं करून शिवसेना फोडली; विद्या चव्हाणांची भाजपावर टीका

| Updated on: Jul 30, 2022 | 4:52 PM

बंडखोर आमदार एकीकडे भाजपाशासित गुजरात राज्यातील सुरतमध्ये जातात आणि दुसरीकडे शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणतात, यावर विद्या चव्हाण यांनी शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपावर हल्ला चढवला.

Vidya Chavan : शरद पवारांनी नाही तर देवेंद्र फडणवीसांनी कटकारस्थानं करून शिवसेना फोडली; विद्या चव्हाणांची भाजपावर टीका
विद्या चव्हाण
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना ही शरद पवारांनी फोडली नाही तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कटकारस्थान रचले आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली, असा घणाघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केला आहे. त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. येथील महाराष्ट्र सदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादीवरचे आरोप खोडून काढले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना फोडली, असा आरोप सातत्याने शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपाकडून होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना विद्या चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. आमदार सुरतला पळून गेले. जर बारामतीला आले असते तर आम्ही म्हटले असते, की शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

‘हाच त्यांचा कार्यक्रम’

नवी दिल्लीत महिला आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होती. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. विद्या चव्हाण यावेळी म्हणाल्या, की शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करून मोकळे व्हायचे, असा त्यांचा कार्यक्रम आहे. शरद पवारांवर टीका केली, की प्रसिद्धीही मिळते. बंडखोर आमदार एकीकडे भाजपाशासित गुजरात राज्यातील सुरतमध्ये जातात आणि दुसरीकडे शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणतात, यावर त्यांनी शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपावर हल्ला चढवला.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांवरही टीका

राज्यपालांनी याआधीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता मुंबईतील कष्टकरी माणसाचा अपमान केला आहे. या कष्टकऱ्यांच्या जोरावरच मोठमोठे व्यवसाय उभे राहतात. हा पाया रचण्याचे काम कष्टकरी करत असतात. त्यांचा अपमान राज्यपालांनी केला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे या व्यावसायिकांनी मुंबईच्या बाहेर राहून व्यवसाय करून दाखवावे, असा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केला आहे. ते राज्यपाल म्हणून काम न करता भाजपाचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. मुंबईतील जनता त्यांना गो बॅक करणार आहे, असेही चव्हाण म्हणाल्या. दरम्यान, आम्ही जी परिस्थिती येईल त्यावर काम करतो. निवडणुका आल्या तरी आमची तयारी आहे आणि विरोधात बसावे लागले तरी आम्ही काम करू, असे चव्हाण यांनी सांगितले.