नवी दिल्ली: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळेच ठाकरे सरकार कोसळल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं, असा घरचा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे आता यावर विजय वडेट्टीवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विजय वडेट्टीवार हे दिल्लीत आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चाही केली. मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तेव्हापासून आलो नव्हतो. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. राज्यातील राजकारणावर सहज चर्चा झाली. ती त्यांच्या कानावर टाकली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
नाना पटोलेंसारखा मजबूत व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी उत्तम रितीने सभागृह चालवलं होतं. त्यांचं सभागृहावर नियंत्रण होतं. ते अभ्यासू अध्यक्ष होते. राजीनामा दिल्याने पेचप्रसंग झाला आणि सरकारचा पायउतार झाला. तेव्हा अनेकांच्या भावना होत्या त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं, असं वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा आहेत. त्यावर काही चर्चा झाली का? असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावर, प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा अधिकार हा हायकमांडचा आहे. ते माहिती घेऊनच निर्णय घेतात, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला काय? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, याबाबत हायकमांडला अधिकार आहे. राजीनामा स्वीकारायचा, नाही स्वीकारायचा हे हायकमांड ठरवले. पण राज्यात ज्या घटना घडल्या त्या होऊ नये. राज्यात काँग्रेसमय वातावरण होत असताना हे चित्रं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसमधील वादाचा फायदा घेणार नाही, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मविआ सरकार असताना भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात होते. आता सत्ता असल्यामुळे काही अफवा उठत असतील, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची दखल पक्षश्रेष्ठी घेतील. सातव यांना सुरक्षा देण्याबाबत आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.