Agnipath Protest Bihar : ‘अग्निपथ’ योजनेच्या (Agneepath Yojana) विरोधात शनिवारी सलग चौथ्या दिवशीही देशाच्या विविध भागात निदर्शने सुरू आहेत. आतापर्यंत 210 मेल एक्सप्रेस आणि 159 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. दोन मेल एक्सप्रेस गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 371 गाड्या प्रभावित झाल्या आहेत. बिहारमधील रेल्वेने मोठा निर्णय घेत पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द होऊ शकतात. त्याचवेळी आग्रामध्ये यूपी प्रशासनाने कोचिंग सेंटर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मिर्झापूरमध्ये बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणार्या ‘अग्निवीर’साठी (Agniveer) संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमध्ये 10% पदे राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे 10% आरक्षण भारतीय तटरक्षक दल आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये लागू केले जाईल. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असेल. तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली.
दुसरीकडे बिहारमधील विद्यार्थी संघटनांनी अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ बिहार बंदची हाक दिली आहे. तसेच अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आणि तसं झालं नाही तर भारत बंदची हाक दिली जाईल असेही सांगण्यात आलं आहे.
बिहार बंद दरम्यान पाटणा जिल्ह्यातील पाटणा-गया रेल्वे सेक्शनवरील तारेग्ना रेल्वे स्थानकावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार चकमक झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी जीआरपी पोलिस स्टेशनवर ताबा मिळवला आणि अनेक वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वतीने सोशल मीडियावर देशातील तरुणांना संदेश देण्यात आला असून, त्यामध्ये त्यांनी न्याय मागण्यांसाठी अहिंसक आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, अग्निपथ योजनेवरून वाढता गोंधळ पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असे सांगण्यात आले आहे की CAPF आणि आसाम रायफल्समधील भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण दिले जाईल. तसेच, कमाल प्रवेश वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निपथ योजनेच्या पहिल्या बॅचसाठी ही सूट 5 वर्षांची असेल.
10% of the job vacancies in the Ministry of Defence to be reserved for ‘Agniveers’ meeting requisite eligibility criteria: RMO India pic.twitter.com/PGSzhBSHke
— ANI (@ANI) June 18, 2022
जेहानाबाद जिल्ह्यातील तेहता ओपीमध्ये बंद समर्थकांनी जप्त केलेली वाहने पेटवून दिली आणि तेथे गोंधळ घातला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. उत्तर प्रदेशातील जौनपूर आणि चंदौलीमध्ये संतप्त तरुणांनी एनएच जाम करून बसची तोडफोड केली आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.