ऐन उन्हाळ्यात अवकाळीचा (Unseasonal rain) फटका बसल्यानं बळीराजा हैराण झालाय. सामान्य नागरिकांनाही बदलत्या हवामानाला (Weather) सामोरे जावे लागत आहे. 15 मार्चपासून राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात अभूतपूर्व अशा गारपिटीची दृश्य समोर आली आहेत. पांढऱ्या शुभ्र गारांची बरसात, जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पाऊस अशी स्थिती दिसून आली. सोशल मीडियावर हे गारांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका महाराष्ट्रासह इतरही राज्यांना बसलाय.
Heavy rains with Hailstorm in some places of Telangana… ??⛈️❄️ #Telangana #Telanganarains #rain #hailstorm pic.twitter.com/vN0o31FzUN
— Telugu Swaggers (@Telugu_Swaggers) March 16, 2023
तेलंगणातील काही भागात हवामान बदलाची स्थिती अधिक गंभीर दिसून येतेय. तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात तर गारपीटीचा कहर झालाय. विशेष म्हणजे दुपारी १ वाजेनंतर वातावरणात हा कमालीचा बदल होऊन थेट गारांचा पाऊस सुरु झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.
तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात गारांचा अक्षरशः खच पडला. घरांची छतं, झाडांवर तसेच रस्त्यांवर गारांचा वर्षाव झाला. विकाराबाद जिल्ह्यातील मर्पल्ली मंडळ क्षेत्रात धुँवाधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम झाले. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळत झाले. अशा प्रकारचा धुँवाधार पाऊस यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, अशा प्रतिक्रिया येथील रहिवासी देत आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत एवढा पाऊस होईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. तोपर्यंत कडक ऊन होते. १ वाजेनंतर आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. अचानक हवामान बदलले. आकाशातून गारांचा वर्षाव सुरु झाला. गारांचा पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची पळापळ सुरु झाली. गारा पडून डोक्यावर जखमा होऊ नयेत म्हणून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले.
तेलंगणात गारपीटीनं हाहाकार माजला आहे. जवळपास अर्धा ते पाऊणतास सतत गारपीट सुरु असल्याने विकाराबादमधील अनेक ठिकाणी रस्त्यांवर गारांचा खच पडलेला दिसून आला. पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानंतर लोकांनी आपापल्या वाहनांतूर घरी जाणे पसंत केले. मात्र रस्त्यावर पडलेल्या गारांतून मार्ग काढत जाणेही कठीण जाऊ लागले.