दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रींगचा तपास करणाऱ्या ईडीने गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांच्यावर ते या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप ठेवला आहे. भारत राष्ट्र समितीच्या ( बीआरएस ) के.कविता यांनी मद्य धोरण ठरविताना केजरीवाल, आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या सोबत कट रचल्याचे ईडीने प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.
भारत राष्ट्र समितीच्या के.कविता यांना काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांच्या घरातून अटक केल्यानंतर त्यांनी रिमांडमध्ये दिलेल्या माहीती आधारे ईडी केजरीवाल यांची चौकशी करीत आहे. के.कविता आणि केजरीवाल यांच्या मद्य धोरण ठरविण्यात जी बोलणी झाली त्या संदर्भात केजरीवाल यांच्याकडून ईडीला उत्तरे हवी आहेत.
के. कविता यांच्या अटकेनंतर त्यांनी दिलेल्या कबूली जबाबाआधारे ईडीने केजरीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, तत्कालिन उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, के.कविता यांच्या सोबत आपच्या अन्य नेत्यांनी मिळून एक्साईज पॉलिसी तयार करणे आणि तिला लागू करण्याची योजना आखली होती. त्यातून कोट्यवधी रुपये कमविण्याची योजना यांनी आखली होती.
के. कविता यांच्या अटकेनंतक केजरीवाल यांना केव्हाही अटक होऊ शकते असे म्हटले जात होते. साऊथ लॉबीच्या के. कविता यांच्याद्वारे आलेल्या 100 कोटी रुपयांच्या लाचेचा पक्षासाठी केलेला वापर आणि मनीट्रेल संदर्भातच केजरीवाल यांची चौकशी सुरु आहे. आरोपींपैकी एक विजय नायर नेहमीच केजरीवाल यांच्या कार्यालयात जायचा आणि त्याचा बहुतांशी वेळ तेथेच घालवायचा असे ईडीने म्हटले आहे.
विजय नायर याने मद्य व्यापारी आणि केजरीवाल यांच्या मिडलमॅन म्हणून काम केले आहे. नायर यानेच इंडोस्पिरीटचे मालक समीर महेंद्रू यांची केजरीवाल यांच्याशी ओळख करून दिली होती. जेव्हा यांची बैठक झाली नाही तेव्हा त्याने महेंद्रू आणि केजरीवाल यांचे व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. यात केजरीवाल यांनी नायर त्यांच्या मुलासारखा असून त्याच्यावर विश्वास असल्याचे म्हटले होते.