नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : बँक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संताप झाला आहे. त्यांनी बंदची हाक (Bank Strike) दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांचे केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी खटके वाजत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्यांच्यात बिनसत आहे. बरं एकदाचा तो काय सोक्षमोक्ष काही लागत नाही. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वारंवार बंदचे हत्यार उपसावे लागत आहे. केंद्र सरकार आणि बँक संघटनेत संवाद होत नाहीत का? संघटनांच्या मागण्या सरकारला पटत नाहीत का की त्यांना त्या समजूनच घ्यायच्या नाहीत. कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची कोणती धोरणं योग्य वाटत नाही, यावर खलबत होण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांनी या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षांत बंदची हाक दिली आहे. काय आहेत त्यांच्या मागण्या?
13 दिवसांचा बंद
ऑल इंडिया बँक एप्लाईज युनियन या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास बंदची हाक दिली आहे. डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान हा बंद असेल. कर्मचारी 13 दिवसांच्या बंदवर जातील. देशातील वेगवेगळ्या राज्यात विविध बँकेतील कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. 19 आणि 20 जानेवारी रोजी संपूर्ण देशात भारतीय बँका दोन दिवसांचा संप करुन केंद्र सरकारचे लक्ष वेधतील.
काय आहेत मागण्या
कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. थेट भरती करण्याऐवजी आऊटसोर्सिंगवर भर देण्यात येत असल्याने कर्मचारी नाराज आहेत. नियमीत कर्मचारी भरती करण्यावर भर देण्याची मागणी करण्यात आली आहे. एआयबीईएचे महासचिव सी. एच. वेकंटचलम यांनी याविषयीची माहिती दिली. ग्राहकांची संख्या वाढली आहे. तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. निवृत्ती, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे निधन यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे अद्यापही भरण्यात आलेली नाही. कामकाजाचा ताण वाढलेला असतानाही कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. त्याविरोधात संपाची हाक देण्यात आली आहे.
या काळात कामकाज बंद
भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचारी संघटना नाराज आहेत. एकाच व्यक्तीवर कामाचा ताण वाढत आहे. त्याच्यावर अनेक कामांचा भार एकाचवेळी पडतो. कर्मचारी कामाचा हा बोजा किती दिवस सहन करणार असा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरुपी पदभरती करणे आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी 4 ते 11 डिसेंबर आणि पुढील वर्षात 2-6 जानेवारी, 2024 मध्ये बंदची हाक दिली आहे.