नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची मोठ्या उत्साहात तयारी सुरु सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणारी या सोहळ्याचे निमंत्रण अनेक सेलेब्रिटी कलाकार, उद्योगपती, राजकीय नेते यांना देण्यात आले आहे. तयच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 2019 साली रामजन्मभूमीवर ऐतिहासिक निकाल देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. 2019 मध्ये निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती एसए बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश होता.
2019 मध्ये रामजन्मभूमी वादात हिंदूंच्या बाजूने निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांपैकी चार न्यायाधीश निवृत्त झाले आहेत. तर एक न्यायाधीश अजूनही सर्वोच्च न्यायालयात आहे.
2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला त्यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे सरन्यायाधीश होते. ते ही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे एक भाग होते. निकाल दिला त्याच वर्षी म्हणजेच 2019 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या चार महिन्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचाही समावेश होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर बोबडे देशाचे सरन्यायाधीश झाले. 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्तीनंतर ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यांचे नाव आजही या विद्यापीठातील एमेरिटस प्राध्यापकांमध्ये समाविष्ट आहे.
अयोध्येचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात न्यायमूर्ती अशोक भूषण हे जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. यानंतर केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाचे (एनसीएलएटी) अध्यक्ष केले.
अयोध्येबाबत निकाल देणाऱ्या घटनापीठात न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांचाही समावेश होता. जानेवारी २०२३ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. अवघ्या एका महिन्यानंतर त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांच्या नियुक्तीवरून बराच वादंग आणि राजकीय गदारोळ निर्माण झाला होता.
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे या पाच खंडपीठाचे एक भाग होते. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर 2024 पर्यंत ते या पदावर असतील.