नवी दिल्ली : भारताचे नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 च्या वतीने दिनांक 17 आणि 18 जून रोजी दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today) या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक शिखर परिषदेमध्ये राजकारण (Politics), प्रशासन, अर्थशास्त्र, आरोग्य , संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व प्रभावशाली व्यक्ती सहभागी होणार आहेत. ‘टीव्ही 9’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिखर परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील 75 तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. या ग्लोबल थिंक फेस्टमध्ये जागतिक स्तरावर भारताचा वाढता प्रभाव, जगाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या दिशेने सुरू असलेली भारताची वाटचाल आणि जागतिक दहशतवाद अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आतंरराष्ट्रीय वक्त्यांमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय वक्त्यांमध्ये गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच अनेक केंद्रीय मंत्री तसेच राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
टीव्ही 9 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ग्लोबल थिंक फेस्टमध्ये देश-विदेशातील नामवंत व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत. टीव्ही 9 च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ या ग्लोबल समिटचे उद्घाटन सत्र “विश्वगुरु: कितने पास कितने दूर” या थीमवर आधारीत असणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 17 जूनला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे प्रमुख वक्ते असणार आहेत. तर 18 जून रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भाषणाने परिषदेला सुरुवात होणार आहे. भारत विश्वगुरू बनण्याच्या किती जवळ आला आहे, यावर 15 क्रेंद्रीय मंत्री आणि कार्यक्रमात सहभागी झालेले विविध राज्याचे मुख्यमंत्री आपले मत मांडणार आहेत.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई हे देखील या ग्लोबल थिंक फेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. याबाबत बोलताना कॅमेरून यांनी म्हटले आहे की, मी TV9 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल थिंक फेस्टमध्ये सहभागी होणार आहे. मला अभिमान वाटतो की मी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात भारतातील अनेक मान्यवर नेतेमंडळी सहभागी होणार आहेत. दोन दिवस विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मी जेव्हा पंतप्रधान होतो, तेव्हा आपण ब्रिटन आणि भारताचे संबंध अधिक मजबूत कसे होतील यासाठी कायम प्रयत्न केल्याचे कॅमेरून यांनी म्हटले आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी भागिदारी राहिलेली आहे. आम्ही देखील काही काळ या भागिदारीचे साक्षिदार होतो. आता काळ बदलला आहे. सध्या दोन्ही देशांपुढील आव्हाने वेगळी आहेत. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, म्हणूनच या परिषदेत सहभागी होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
तर या शिखर परिषदेबाबत बोलताना अफगानिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई यांनी म्हटले आहे की, मी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्साहित आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील परस्पर हितसंबंधांवर बोलण्याची संधी मिळाली असल्याचे यावेळी करझाई यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाबाबत बोलताना TV9 नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बरुण दास यांनी म्हटले आहे की, “संवाद, चर्चा आणि विचारविमर्शाद्वारे जागतिक क्षेत्रात भारताच्या नेतृत्वाची ब्लू प्रिंट तयार करणे हा या शिखर परिषदेचा मुख्य उद्देश आहे. भारताला जर विश्वगुरू बनवायचे असेल तर सामूहिक वचनबद्धतेची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
या शिखर परिषदेमध्ये राजकारण, व्यापार व अर्थव्यवस्था, सामाजिक- सांस्कृती विषय, आरोग्य व्यवस्था आणि खेळ, मनोरंजन या चार महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. तसेच भारताने देशासमोर आलेल्या विविध समस्यांचा सामना कसा केला, त्यातून मार्गक्रमन करत इतर देशांसमोर कसा आदर्श निर्माण केला यावर देखील चर्चा होणार आहे.