नवी दिल्ली : TV9 ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ला विविध क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली आणि अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. बाबा रामदेव यांनी आपले विचार मांडतांना सांगीतले की, आपण आपल्या परंपरा जपून ठेवल्या पाहिजे. माझा पूर्ण विश्वास आहे की, 2040 ते 2045 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी ‘आध्यात्मिक’ (Spiritual) आणि ‘आर्थिक’ महासत्ता (Economic superpower) असेल. त्यावेळी भारतही राजकीय महासत्ता असेल. त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा आणि सर्वांप्रती औदार्य असायला हवं. देशाची शान वाढवण्यासाठी मी काय करू शकतो असा प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला विचारायला हवा. बाबा रामदेव म्हणाले, भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकाला थोडे प्रयत्न करावे लागतील. इतरांप्रती उदारतेची भावना (A sense of generosity) ठेवा. कुणाबद्दलही द्वेषाची भावना अजिबात नसावी.
बाबा रामदेव यांच्यासमवेत ग्लोबल समिटचा भाग असलेले धर्मगुरू रमेश भाई ओझा म्हणाले की, धर्माचा संबंध कट्टरतेशी नसून करुणेशी आहे. बाबा रामदेव म्हणाले की, देशातील प्रत्येक माणसासाठी धर्मापूर्वी देश असला पाहिजे. कुणाला मक्का मदीना जायचे असेल तर त्याने जावे, पण मक्का मदीनापूर्वी हिंदुस्थान हा त्याचा मक्का मदीना असावा. ते म्हणाले की, जेव्हा आपण त्यांचे प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही, तेव्हा त्यांना आमच्या महापुरुषांशी बोलण्याचा अधिकार नाही. अशी काही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणे होती, ज्यामुळे लोकांच्या उपासनेच्या पद्धती बदलल्या, परंतु पूर्वज बदलू शकत नाहीत.
बाबा रामदेव म्हणाले, देशात जे काही चालले आहे, त्याचा उद्देश केवळ अराजकता पसरवणे आहे. या लोकांचा एकच अजेंडा आहे की, कसे ही करून पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवावे. 2014 पूर्वी पेट्रोलच्या किमतींबाबत केलेल्या दाव्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, केवळ मीच नाही, तर भारतातील अनेक लोकांना असे वाटते की यावेळी सत्तेत असलेल्यांचा हेतू पूर्णपणे स्पष्ट आहे. चळवळ ही आपली अर्धवेळ नोकरी आहे आणि राष्ट्र उभारणी ही आपली पूर्णवेळ नोकरी आहे.
ग्लोबल समिटमध्ये बोलताना रमेश भाई ओझा म्हणाले की, हे जग सुंदर बनवायचे असेल तर आपण सर्वांनी एका मुद्द्यावर एकमत होणे गरजेचे आहे. कोणताही धर्म कोणत्याही प्रकारचे धर्मांतर करू देणार नाही, हे आपण ठरवले पाहिजे. धर्मांतर कोणत्याही धर्माला शोभत नाही. भारताकडेही विश्वगुरू बनण्याची ताकद आणि धैर्य आहे, पण भारताकडेही खूप काही शिकण्यासारखे आहे.