नवी दिल्ली | 26 February 2024 : जागतिक पटलावर एकामागून एक वेगाने घडामोडी घडत आहेत. या संपूर्ण घडामोडींची अचूक नस टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी पकडली. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात त्यांच्या या सर्व घडामोडींचा आढावा घेणाऱ्या भाषणाने झाली. त्यांनी घटना, कारणे आणि परिणामांना जणू एका माळेत सुरेख गुंफले. त्यांचा शब्द न शब्द समोरील प्रेक्षक कान देऊन ऐकत होता. त्यांनी सध्याच्या जागतिक घडामोडींचा आणि त्याच्या परिणाम यावर भाष्य केले. त्यांनी महागाई आणि धोक्याचे भान करुन दिले.
भारत जगाच्या केंद्रस्थानी
सीईओ बरुण दास यांनी, भारताची या घटनाक्रमातील स्थिती काय असेल याचे चित्र स्पष्ट केले. भारत आता जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा नवीन केंद्रबिंदू असल्याचे योग्य विधान जागतिक नाणेनिधीने केले आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था तिसरी महासत्ता म्हणून आगेकूच करत असल्याचे ते म्हणाले.
चीनची विस्तारवादी भूमिका
इतर अर्थव्यवस्थांना सध्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे ते म्हणाले. चीनची विस्तारवादी महत्वकांक्षा ही जगासाठी धोक्याचा इशारा ठरली आहे. त्यामुळे जगातील लोकशाहीवादी राष्ट्रे चीनपासून दूरावत आहेत. भारताला त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.
स्वावंलबी होण्यासाठी धडपड
भारताला मोठी झेप घ्यायची आहे. पण त्यासाठी अनेक आव्हांनाचा सामना करावा लागणार आहे. युरोप आणि पश्चिम आशियात अनेक घटनाक्रम घडत आहेत. त्याच्यामुळे जगात केव्हा पण संकट येऊ शकते. त्याचवेळी जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. अनेक देशांना स्वावलंबी होण्याची स्वप्न पडत आहेत.
महागाईचे दुष्परिणाम
जगात दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम व्यापार आणि वाणिज्य यांच्यातील संघर्षातून समोर येईल. त्यामुळे ग्राहकांना होणारे फायदे लक्षणियरित्या कमी होतील. जागतिक संकटांचा संदर्भ देत दास म्हणाले की, त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर दिसेल. या अनिश्चिततेमुळे महागाई भडकू शकते आणि लाखो लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात. भारतासह जगात अनेक समस्या आहेत आणि आपल्याला त्यावर समाधान शोधायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.