नवी दिल्ली | 26 February 2024 : TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चा आज दुसरा दिवस आहे. या समिटमध्ये ‘युद्धाचे युग नाही’ या विषयावर भूराजनीतिक रणनीतिकार आणि FACE च्या संस्थापक वेलिना चाकारोवा, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांच्यासह मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मारिया यांनी मालदीव सरकारच्या भारतविषयीच्या धोरणावर हल्लाबोल केला. त्यांनी मालदीव सरकारला खडे बोल सुनावले.
आमचे विरोधक वाढले
भारत आणि मालदीवचे संबंध सध्या ताणले गेले आहे. मालदीवचे माजी संरक्षण मंत्री मारिया दीदी या सरकारवर भडकल्या. मालदीवमध्ये आम्ही शांततेला महत्व देतो. ते आमच्या रक्तातच आहे. पण सध्याचे सरकार वेगळे धोरण राबवत असल्याचे त्या म्हणाल्या. अनेक लोक मालदीवमध्ये सुट्या घालविण्यासाठी येतात. पण आता रणनीती बदल आहे. त्यामुळे आव्हाने वाढली आहेत. त्यामुळे आमचे विरोधक वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम देशाच्या सध्याच्या स्थितीवर होत असल्याचे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान तर ग्लोबल लीडर- अकबरुद्दीन
भारताचे ज्येष्ठ मुत्सद्दी सैयद अकबरुद्दीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते असल्याचे म्हटले. दहा वर्षांपूर्वी मोदी जेव्हा पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांना परराष्ट्र धोरणाचा कोणताही अनुभव नव्हता. पण त्यांनी आता स्वतःला वैश्विक नेते म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आव्हाने स्वीकारली. पंतप्रधान नेहमी म्हणतात की, हे युग लढाईचे नाही. पण याचा अर्थ जगात युद्धच होणार नाहीत असे नाही, पण युद्ध झालेच तर आम्ही त्यातून मार्ग काढू शकतो. तर वेलिना त्चकारोवा यांनी सध्याचे युग शांतीचे आहे. त्यात भारताची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. जगात शांतता कायम ठेवण्यासाठी भारताची विशेष भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या.
देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समीट 2024 च्या दुसऱ्या दिवशी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होतील. राजधानी दिल्लीत होणाऱ्या ग्लोबल समिटमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट सहभागी होतील. याशिवाय परदेश मंत्री एस. जयशंकर आणि अभिनेता आयुष्मान खुराना आणि कंगना राणावत यांच्यासह इतर अनेक प्रतिष्ठीत सहभागी होतील. टीव्ही9 च्या या वार्षिक उत्सवात देशातील राजकीय आणि सध्याच्या जागतिक घाडमोडींवर चर्चा होईल. सोबतच क्रीडा, मनोरंजन आणि अर्थजगतातील अनेक दिग्गज त्यांचे विचार मांडतील.