नवी दिल्ली | 26 February 2024 : जगातिक पटलावर वेगाने घटनाक्रम घडत असताना भारत जगाच्या केंद्रस्थानी आला आहे, असा विश्वास टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी व्यक्त केला. दशकातील बदलांची नोंद घेताना आणि भूराजकीय घडामोडींचा विचार करता विश्वासाने ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे, की सर्व घटना भारताच्या अनुकूल घडत असल्याचे प्रतिपादन दास यांनी केले. त्यांनी भारत अनेक आव्हानांवर मात करत उंच भरारी घेईल, असा दुर्दम्य विश्वास व्यक्त केला. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चा दुसरा दिवसाची सुरुवात त्यांच्या विचार पुष्पाने झाली.
विचारांचे बाळकडू
टीव्ही9 ग्लोबल समीटचे हे दुसरे वर्ष आहे. पण या विचारमंचावरुन अनेक विचारांची घुसळण होऊन त्यातून विचारांच्या कक्षा विस्तारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “भारत: पुढच्या मोठ्या झेपसाठी सज्ज”, या मोठ्या थीमवर हे संमेलन होत आहे. या संमेलनासाठी देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या विचारातून, दृष्टिकोनातून विचारांचे बाळकडू मिळेल, यावर दास यांनी विश्वास व्यक्त केला.
भारत जगाच्या केंद्रस्थानी
भारत आता जगाची आशा आहे. दक्षिणेतील या नेतृत्वाकडे जग आशाने पाहत आहे. भारत आता जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा नवीन केंद्रबिंदू असल्याचे योग्य विधान जागतिक नाणेनिधीने केले आहे. इतर अर्थव्यवस्था सध्या आव्हानांचा सामना करत आहेत. चीनची विस्तारवादी महत्वकांक्षा ही जगासाठी धोक्याचा इशारा ठरली आहे. त्यामुळे जगातील लोकशाहीवादी राष्ट्रे चीनपासून दूरावत आहेत. तर त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्था तिसरी महासत्ता म्हणून आगेकूच करत आहे. या वाटचालीत आपल्याला इतरांना पण सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळेच भारत ‘एक कुटुंब, एक जग आणि एक भविष्य’ या जगाला गरज असलेल्या संकल्पनेवर अविरतपणे चालत राहणार आहे.
अनेक आव्हांनाचा सामना
भारताला मोठी झेप घ्यायची आहे. पण त्यासाठी अनेक आव्हांनाचा सामना करावा लागणार आहे. युरोप आणि पश्चिम आशियात अनेक घटनाक्रम घडत आहेत. त्याच्यामुळे जगात केव्हा पण संकट येऊ शकते. त्याचवेळी जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. अनेक देशांना स्वावलंबी होण्याची स्वप्न पडत आहेत.
जगात दरवाढी होत आहे. त्याचा परिणाम व्यापार आणि वाणिज्य यांच्यातील संघर्षातून समोर येईल. त्यामुळे ग्राहकांना होणारे फायदे लक्षणियरित्या कमी होतील. जागतिक संकटांचा संदर्भ देत दास म्हणाले की, त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर दिसेल. या अनिश्चिततेमुळे महागाई भडकू शकते आणि लाखो लोक गरिबीत ढकलले जाऊ शकतात. भारतासह जगात अनेक समस्या आहेत आणि आपल्याला त्यावर समाधान शोधायचे आहे.
विकसीत भारताचे स्वप्न
संध्याकाळी विकसीत भारताचे स्वप्न यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण ऐकणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते विकसित भारताचं स्वप्न या विषयावर बोलणार आहेत. या संमेलनात अनेक दिग्गज, विचारवंत त्यांचे विचार मांडतील. हे संमेलन अनेक नवीन कल्पना, नवीन गोष्टींची बांधणी करेल, याविषयी आपल्या मनात किंचितही शंका नसल्याचे सीईओ दास यांनी स्पष्ट केले.