नवी दिल्ली : TV9 नेटवर्कच्या वतीने ग्लोबल समिटचे (What India Thinks Today) आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) देखील सहभागी झाले आहेत. यावेळी भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या या मंचावरून संवाद साधला. यावेळी बोलताना तेजस्वी सुर्या यांनी केंद्र सरकारची अग्निपथ ही योजना ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आठ वर्षांच्या ‘जेएनयू’पेक्षा 4 वर्षांचा अग्निवीर हा कितीतरी पटीने अधिक चांगला आहे. मात्र त्यानंतर आपचे नेते राघव चड्ढा यांनी तेजस्वी सुर्या यांना चोख प्रत्युत्तर दिले. ग्लोबल समिटमध्ये तेजस्वी सुर्या आणि राघव चड्ढा यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली.
यावेळी बोलताना राघव चड्ढा यांनी म्हटले की, मी ‘जेएनयू’चा विद्यार्थी नाही, आणि माझ्या पार्टीमध्ये जे नेते आहेत त्यापैकी एकही नेता हा जेएनयूमध्ये शिकलेला नाही. मात्र भाजपा नेत्या आणि केंद्रीय आर्थमंत्री निर्मला सितारमण या जेएनयूच्या विद्यार्थीनी आहेत. परराष्ट्र व्यवहारा मंत्री एस जयशंकर हे देखील जेएनयूचे विद्यार्थी आहेत. जर तेजस्वी सुर्या यांना वाटत असेल की जेएनयूमधील आठ वर्षांचे शिक्षण वेस्ट आहे, तर निर्मला सितारमण आणि एस जयशंकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पुढे बोलताना चड्ढा म्हणाले की, देशाच्या प्रमुख मंत्र्यांबाबत असे बोलने मला योग्य वाटत नाही. मात्र मला यातून हेच सुचवायचे होते की, मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल आदर असायलाच हवा, मग तो व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असो.
पुढे बोलताना राघव चड्ढा यांनी म्हटले की, भाजपाने प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यात अपयश आल्यानंतर आता अग्निपथ योजनेच्या माध्यमातून त्यावर शॉटकट मार्ग शोधला जात आहे. मात्र तुम्ही हा प्रयोग देशाची पॉवर असलेल्या सौनिकांवर का करत आहात. सुरुवातीपासूनच भाजपाचे धोरण हे आहे की, देशात जास्तीतजास्त बेरोजगारी वाढली पाहिजे. त्यामुळे हे बेकार तरुण पुढे पक्षाचे कार्यकर्ते होतील. काही दिवसांपूर्वी एका जमावाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्याचे नेतृत्त्व एका खासदाराने केले. यावरूनच सर्व काही स्पष्ट होत असल्याचे देखील राघव चड्ढा यांनी म्हटले आहे.