देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना एका बातमीने सर्वत्र खळबळ उडवून टाकली. विद्यमान खासदाराचे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल झाले. देशातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या तारखेआधी हे व्हिडीओ व्हायरल झाले. कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे (JDS) हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओंचा जो काही आकडा समोर आलाय तो ऐकूनच सर्वांना धक्का बसत आहे. एक दोन नाहीतर या विद्यमान खासदाराचे 2976 व्हिडीओ व्हायरल झालेत. निवडणुकीच्या वेळी हाे व्हिडीओ नेमके कोणी बाहेर काढले? यामध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे? सर्व प्रकरण जाणून घ्या.
कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचे प्रज्वल रेवण्णा खासदार आहेत. जनता दल सेक्युलर पक्षाकडून 2019 साली ते उभे राहिले होते. भाजपच्या मंजू ए यांचा पराभव करत विजय मिळवला होता. प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय वारसाही मोठा आहे. प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे. रेवण्णा घरातील नऊ लोकं आता राजकारणामध्ये सक्रीय आहेत.
प्रज्वल रेवण्णा यांचे भाऊ सुरज रेवण्णा (विधान परिषद सदस्य), आई भवानी रेवण्णा (जिल्हा परिषद सदस्य), वडील एच.डी. रेवण्णा (आमदार), चुलते एच. डी. कुमारस्वामी (माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस पार्टीचे अध्यक्ष), चुलती म्हणजेच कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी (आमदार) आणि कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी याने विधानसभा आणि लोकसभा निवडणुक लढवली आहे.
देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार होतं. यामध्ये कर्नाटक राज्यामधील 24 जागांवर मतदान होणार होतं. कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचाही समावेश होता. मात्र प्रज्वल रेवण्णा उभे राहिलेल्या मतदारसंघात चार दिवसआधी म्हणजेच 24 एप्रिल 2024 या दिवशी हसन काही अनोळखी लोक येतात आणि सगळीकडे काही पेन ड्राईव्ह फेकतात. लोकांच्या घरात, मार्केट, बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशनवर पेन ड्राईव्ह फेकलेले असतात. जेव्हा हे पेन ड्राईव्ह ओपन करतात आणि त्यामध्ये नेमका काय डाटा आहे पाहतात तेव्हा त्यांना चारशे व्होल्टचा झटका बसतो. कारण या पेन ड्राईव्हमध्ये त्यांच्या मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या प्रज्वल रेवण्णाचे सेक्स व्हिडीओ असतात. व्हिडीओंचा आकडा पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. कारण रेवण्णा यांचे तब्बल 2976 व्हिडीओ होते. व्हिडीओ कर्नाटक राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नागालक्ष्मी चौधरी यांनीही व्हिडीओ पाहिले.
मी व्हिडीओ पाहिले पण ते पूर्ण पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. या व्हिडीओमधील तरूणी हात जोडत विनंती करत आहेत. व्हिडीओमधील काही मुलींनी माझ्याशी संपर्क साधत नाव ना सांगत घडलेलं सर्व काही सांगितलं. हा या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा सेक्स स्कँडल असल्याचं नागालक्ष्मी चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी पत्र लिहित या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. आता एसआयटी स्थापन केली गेली असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
निवडणुकीच्या चार दिवस व्हिडीओ समोर आले तरीसुद्धा प्रज्वल रेवण्णा प्रचार करत होते. आपल्या मतदारसंघात मत मागण्यासाठी फिरत होते. मतदान झाल्यावर दुसऱ्याच दिवशी 27 एप्रिल 2024 ला रेवण्णा आपल्या डिप्लोमाटिक पासपोर्टने जर्मनीला निघून गेले. मी कामानिमित्त बाहेर देशात गेलो असून पुन्हा परतरणार असल्याचं प्रज्वल रेवण्णा यांनी ट्विट केलं.
व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते. 28 एप्रिल 2024 ला रेवण्णा यांच्या घरी काम करणारी महिला होलेनारासीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करते. तक्रारीमध्ये, 2019 पासून मी रेवण्णा यांच्या घरी कामाला लागले. ज्यावेळी रेवण्णा यांच्या घरी आले तेव्हा तिथे सहा महिला कामाला होत्या. त्यांनी मला प्रज्वलपासून सावध राहायला सांगितलं. काही दिवसांनी प्रज्वल यांनी माझ्यावर जबरदस्ती केली, याची तक्रार त्यांचे वडील एच. डी. रेवण्णा यांना केल्यावर त्यांनीही माझं लैंगिक शोषण केलं होतं. स्टोर रूममध्ये मला घेऊन जात माझ्यावर अत्याचार केला. इतकंच नाहीतर माझी मुलीचाही नंबर घेत तिला रेवण्णा व्हिडीओ कॉल करायचा. आता व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समोर आल्यावर तक्रार करण्यासाठी माझी हिंमत झाल्याचं पीडित महिलेने म्हटलं.
प्रज्वल रेवण्णा यांच्या घरात एक ड्रायव्हर होता त्याचं नाव कार्तिक गौडा. कार्तिक गेली 15 वर्षे त्यांच्या घरी काम करत होता. घरातील सर्वांचा तो विश्वासू होता, एच. डी. रेवण्णा म्हणजे प्रज्वल यांचे वडील यांच्यासोबत तो आधी होता. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणूम काम पाहत होता. कार्तिक हा रेवण्णा यांच्या घरातील इतका विश्वासू होता की बेनामी जमीन खरेदी केल्यावर त्याच्या नावावर केली जायची अशी चर्चा आहे. हाच वादाचा मुद्दा ठरला, 2022 साली कार्तिक याच्या नावावर होलेनारासीपूरमधील 13 की 16 जमीन त्याच्या नावावर केली जाते. रेवण्णा फॅमिली जमीन माघारी मागतात पण तो काही देत नाही.
कार्तिक 6 डिसेंबर 2023 ला कोर्टात जातो आणि जागेचे सर्व पेपर दाखवतो आणि जमीन हडपण्याासाठी प्रज्वल रेवण्णा आपल्याला धमकी देत असून माझ्या पत्नीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करतो. प्रज्वल रेवण्णा यांचा कार्तिक खास असल्याने त्याच्याकडे रेवण्णाच्या फोन इतर इलेक्ट्रानिक्स उपकरणांचे पासवर्ड आणि अॅक्सेस असतात. तो रेवण्णाच्या फोनमधील सर्व व्हिडीओ एका पेन ड्राईव्हमध्ये घेतो. कार्तिकने एक व्हिडीओ शेयर करत त्यामध्ये या प्रकरणाची सर्व माहिती दिली होती.
हे सर्व सुरू असताना जनता दल सेक्युलर हे काँग्रेससोबत होतं. त्यामुळे कार्तिक हा भाजप नेते देवराज गौडा यांना भेटतो. पेशाने वकील असलेल्या देवराज गौडा यांनी रेवण्णांच्याविरोधात निवडणुक लढवली होती. कार्तिक याची कोर्टात सुरू असलेली केस देवराज गौडा लढत होते. एक दिवस तो रेवण्णांच्या व्हिडीओबद्दल सांगतो आणि माझ्याकडे पेन ड्राईव्ह असल्याचं सांगतो. ही गोष्ट प्रज्वल रेवण्णा यांना समजते. रेवण्णा 1 जून 2023 मध्ये रेवण्णा बंगळुरूच्या सिविल कोर्टात जातात. तीन लोकांचा सहभाग असून ते माझे काही मॉर्फ केलेले व्हिडीओ आहेत. राजकीय करियर संपवण्यासाठी बाहेर आणले जात आहेत. त्यानंतर ते कोर्ट 85 मीडिया संस्था आणि तीन व्यक्तींवर स्टे ची ऑर्डर देते की यातील काही बाहेर येणार नाही.
कोर्टाने आदेश दिल्याने माहिती असुनसुद्धा सर्वांचे हात बांधले गेले होते. मीडियाही काही समोर आणू शकत नव्हतं. मात्र यादरम्यान सर्व पक्षातील वरिष्ठांना या प्रकरणाची चाहुल लागली होती. मात्र तोपर्यंत व्हिडीओ कुठेही गेले नव्हते. कारण कार्तिक याने कोणालाही ते व्हिडीओ दिलेले नव्हते. मात्र देवराज गौडा कार्तिकला सांगतात की कोर्टाला व्हिडीओ दाखवत स्टे ची ऑर्डर रद्द होऊ शकते. तेव्हा कार्तिक पेन ड्राईव्ह देवराज गौडा यांना देतो.
हे सर्व सुरु असताना जनता दल सेक्युलर आणि भाजप एकत्र येतात. त्यावेळी भाजप जनता दलाला तीन जागा देतं. जनता दलाकडून तीनमधील हसन मतदारसंघात परत एकदा प्रज्वल रेवण्णा यांना उमेदवारी देतं. प्रज्वल रेवण्णा यांना तिकीट जाहीर झाल्यावर देवराज गौडा हे कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडीरूप्पा यांना 8 डिसेंबर 2023 ला पत्र लिहितात.
या पत्रामध्ये, भाजप आणि जनता दलाची युती झाली आहे. यामधील हसन मतदारसंघाचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचे व्हिडीओ आहेत जे काँग्रेसकडेही पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हे व्हिडीओ भाजप आणि जनता दलाविरोधात विरोधी पक्ष याचा ब्रह्मास्त्राप्रमाणे उपयोग करू शकतं. याचा भाजपच्या प्रतिमेला देशपातळीवर फटका बसू शकतो. मात्र विजयेंद्र येडीरूप्पा केलेला मेल बाऊंन्सबॅक झाल्याचं देवराज गौडा यांनी म्हटलं आहे.
देवराज गौडा जानेवारी 2024 ला एक पत्रकार परिषद घेतात. त्यामध्ये ते सांगतात की, माझ्याकडे असे पुरावे आहेत ज्यामध्ये रेवण्णा कुटूंब बरखास्त होऊ शकतं. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर देवराज गौडा यांनी माझा एकही फोन उचलला नाही, असं ड्रायव्हर कार्तिकने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर काही दिवसांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये हसन मतदारसंघामध्ये मतदानप्रक्रिया पार पडणार असते. मात्र चार दिवसांआधीच पेन ड्राईव्ह लोकांपर्यंत पोहोचवले जातात. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
ड्रायव्हर कार्तिक सांगतो की, मी पेन ड्राईव्ह फक्त देवराज गौडा यांना दिला आहे. दुसऱ्या कोणालाही मी पेन ड्राईव्ह दिला नाही. तर दुसरीकडे देवराज गौडा सांगतात की, जर पेन ड्राईव्ह लिक झाला तर आमच्या पार्टीचं नुकसान होणार होतं. कार्तिक याला पेन ड्राईव्हबद्दल विचारलं तर त्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यांना हा व्हिडीओ दिल्याचं त्याने सांगितलं होतं. मात्र कार्तिकने आपण गौडा सोडून इतर कोणालाही पेन ड्राईव्ह दिला नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, भाजपवर टीका होऊ लागल्यावर त्यांनी यावर बोलताना, आम्ही जनता सेक्युलर दलाला तीन जागा दिल्या होत्या. त्या जागेवर कोणाला उभं करायचं हा त्यांचा प्रश्न असल्याचं भाजपने म्हटलं आहे. मात्र आता पाहायला गेलं तर, कथित सेक्स व्हिडीओमधील प्रज्वल रेवण्णा देश सोडून गेले आहेत. त्यांचे वडील आमदार एच. डी. रेवण्णा यांना अटक झाली आहे. मात्र या सगळ्यात रेवण्णाचे ज्या महिला आणि तरूणींसोबत व्हिडीओ आहेत त्यांचे चेहरे रिव्हिल झालेत.
व्हिडीओंचा आकडा हा जवळपास तीन हजार इतका आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील पीडितांचे चेहरे ब्लर केलेले नाहीत. यामध्ये पक्षामधील महिला नेत्या आणि कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सदस्य, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि घरातील महिला नोकर यांचा समावेश आहे. एखादी तरूणी किंवा महिला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलू शकते. भावनाशून्य होतं व्हिडीओ लिक करणाऱ्यांनीही महिलांचे जसेच्या तसे व्हिडीओ लिक केले. आता या प्रकरणात आणखी काय माहिती येते हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.