नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : टोमॅटो, भाजीपाला यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. डाळी, तांदळानंतर आता गव्हाचे भाव (Wheat Price Hike) पण आकाशाला भिडले आहेत. देशात गव्हाचे भाव सहा महिन्यात सर्वात उच्चांकावर जाऊन पोहचले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून सणसुदीचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. गव्हाचे भाव वाढल्याने केंद्र सरकार आयात शुल्क माफ करु शकते, असा दावा करण्यात येत आहे. पण त्याविषयीचे केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किंमती स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अन्नधान्य महागाई वाढली
गव्हाच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. त्याचा थेट परिणाम गव्हाच्या सीलबंद पीठापासून इतर सर्व पदार्थांवर दिसून येत आहे. बिस्किटापासून ते ब्रेडपर्यंत सर्वांच्या किंमती वधारल्या आहेत. जून महिन्यात खाद्य महागाई वाढली. हा महागाई दर 2.96 टक्क्यांहून 4.49 टक्क्यांवर पोहचला आहे. गव्हाच्या किंमती वधारल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
गव्हाच्या किंमती इतक्या भडकल्या
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, एक ट्रेडर्सने गव्हाच्या महागाईचे एक कारण समोर आणले. गव्हाचे उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्याकडून पुरवठा ठप्प झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत. पीठ तयार करणाऱ्या मिलला पण गव्हाचा पुरवठा होत नसल्याने पीठाच्या किंमती वाढल्या आहेत. मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये गव्हाचे भाव 1.5 टक्क्यांनी वधारल्या. किंमती 25,446 रुपये प्रति मॅट्रिक टनावर पोहचल्या. 10 फेब्रुवारी 2023 नंतर भावात मोठी वाढ झाली. गव्हाच्या किंमतीत गेल्या चार महिन्यात 18 टक्के इतकी वाढ झाली आहे.
तांदळाची दरवाढ
अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने या आठवड्यात आकडेवारी संसदेसमोर मांडली. तांदळाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार ठेवत आहे. पण गेल्यावर्षीपासून किंमती सूसाट आहे. त्यातच निसर्गचा फटका बसल्याने तांदळाने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली. गुरुवारी तांदळाची सरासरी किंमत 41 रुपये प्रति किलोग्रॅमवर झाली. गेल्यावर्षी हा भाव 37 रुपये होता.
डाळी पण महागल्या
गेल्या एका वर्षात तूर डाळीने किंमतीत आघाडी घेतली. डाळीच्या किंमतीत 28 टक्क्यांची वाढ दिसून आली. उडदाची डाळ आणि पीठाच्या किंमतीत वर्षभरात 8 टक्क्यांची दरवाढ दिसून आली.
डाळीच्या उत्पादनात घट
मंत्रालयाने तूर डाळीच्या किंमती वाढण्यामागे उत्पादन घटण्याचे कारण पुढे केले. 2022-23 या वर्षात कृषी मंत्रालयाने तिसऱ्यांदा उत्पादनाचा आकडा अंदाज वर्तवला. हा अंदाज सातत्याने घसरत आहे. 42.2 लाख टनाहून हा आकडा थेट 34.3 लाख टनावर आला आहे.