नवी दिल्ली : 15 ऑगस्ट 2023 । भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केले. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक घोषणा केल्या. देशाच्या सीमा या चोहोबाजूने सुरक्षित केल्या असे मोदी यांनी भाषणात सांगितले. देशाच्या सीमा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. आपले सैन्य युद्धासाठी सज्ज असले पाहिजे यासातही सैन्याचे आधुनिकीकरण केले असे त्यांनी सांगितले. पूर्वी इथे बॉम्बस्फोट झाले, तिथे बॉम्बस्फोट झाले असे रोज ऐकत होतो. परंतु, आज देशात शांतता नांदत आहे. बॉम्बस्फोट मालिकांचे युग, निष्पाप लोकांचे मृत्यू ही आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. देशात दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतील अभ्यासाचा उल्लेख केला. प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण देता येईल यावर आम्ही भर दिला. त्यामुळेच आज मातृभाषेचे महत्त्व वाढत आहे. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वाचा आहे, अशा शब्दात मोदी यांनी त्या निर्णयाचे कौतुक केले.
26 जानेवारी 2023 या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाने अधिक संस्मरणीय बनवले. 26 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने एक हजाराहून अधिक निर्णयांचे दहा भाषांमध्ये भाषांतर केले. त्याची व्याप्ती आणखी भाषांमध्ये वाढविण्यात आली आहे. सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून हे निर्णय भाषांतर केले. ही सर्वात मोठी बाब आहे असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकरणाचा निकाल देताना तो स्थानिक भाषेत किंवा न्यायालयात आलेल्या व्यक्तीच्या भाषेत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यायासाठी रांगेत उभ्या असलेल्या देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. यामुळे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या मोहिमेला वेग येईल असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी लाला किल्यावरून केलेल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कोतुक केल्यावर तेथे उपस्थित असलेली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी हात उंचावून मोदी आणि उपस्थितांना अभिवादन केले.