नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचा निवडणूकांच्या तयारीवर परिणाम होणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला ? तेही अशा वेळी जेव्हा निवडणूक आयोगाचे तीन सदस्यीय पॅनल केवळ दोन सदस्यांच्या आधारे चालत असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. एक सदस्य अनूप चंद्र पांडेय फेब्रुवारीत निवृत्त झाले आहेत. आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावरच जबाबदारी आहे. यामुळे निवडणूकांच्या जठील प्रक्रियेवर परिणाम होणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
अरुण गोयल माजी आयएएस अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील 1985 च्या बॅच अधिकारी असलेल्या अरुण गोयल यांनी पंजाब विद्यापीठातून गणितात सुवर्ण पदक मिळविले आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे फेब्रुवारी 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत, त्यांच्या जागी अरुण गोयल यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होणार होती. अरुण गोयल यांना नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणूक आयुक्त पदावर नियुक्त केले होते. त्यावेळी देखील अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यावेळी ते अवजड उद्योग विभागात सचिव होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरच त्यांना निवडणूक आयुक्त पदावर घेतले होते.
अरुण गोयल यांचा जन्म 7 डिसेंबर 1962 रोजी पटीयाला येथे झाला. ते पंजाब कॅडरचे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. गोयल कॅंब्रिज विद्यापीठातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्यएट केले आहे. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून देखील शिक्षण घेतले आहे. अवजड उद्योग मंत्रालयात त्यांनी ई-व्हीकर साठी खूप काम केले. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटीव्ह योजनेची सुरुवात केली.लुधियाना आणि भठींडा जिल्ह्यातही त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले आहे. पंजाबचे मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहीली आहे. तेव्हा त्यांनी चंदीगड आणि अन्य शहरांसाठी मास्टर प्लान तयार केला होता. साल 2022 मध्ये निवडणूक आयुक्त पदावर आणताना वाद निर्माण झाला होता. परंतू न्यायालयाने यात दखल देण्यास नकार दिला. नंतर निवडणूक आयुक्त पदावर असताना ते कोणत्याही वादात सापडले नाहीत.
गोयल यांच्या राजीनाम्याने लोकसभा निवडणूकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. तरीही आता सर्व भार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर येऊन पडला आहे. निवडणूकांसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यास कोरम पूर्ण असावा अशी काही अट नसल्याचे म्हटले जात आहे.