नवी दिल्ली : देशातील राजधानीत सेंट्रल व्हीस्टा पुनर्विकास प्रोजेक्टमध्ये नवीन संसद भवन उभारले गेले आहे. या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी संपन्न होत आहे. हे संसद भवन गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या बहिष्काराच्या बातम्यांनी चर्चेत आहे. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे अशी विरोधकांची मागणी आहे. या भव्य इमारतीच्या उद्घाटनासाठी अनेक मान्यवरांना बोलावणे धाडले आहे. ज्यात सर्व खासदार, राज्यांचे मुख्यमंत्री सह अनेक जणांचा सहभाग आहे. या सर्व पाहूण्यांमध्ये ती खास व्यक्तीही असेल ज्यांनी या सुंदर इमारतीचे डीझाईन केले आहे. ज्यांच्या डीझाईनवर सरकारने 1200 कोटी रूपये खर्च केले आहेत. कोण आहे ती व्यक्ती पाहुयात…
राजधानी दिल्लीच्या मध्यभागी आणि व्हीआयपी परीसरात उभारलेल्या संसद भवनाच्या नवीन इमारतीचे डीझाईन गुजरातचे आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. यापूर्वी बिमल पटेल यांनी गुजरात हायकोर्ट, विश्वनाथ धाम, श्री काशी विश्वनाथ मंदिर ( वाराणसी ), आयआयएम अहमदाबाद, आयआयटी जोधपुर सारख्या इमारतींचे डीझाईन केले आहे. याच बरोबर त्यांनी अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंटचे देखील डीझाईन केले आहे. त्यांची कंपनी HCP डीझाईन, प्लानिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने गुजरात सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांवर काम केले आहे.
बिमल पटेल हे अहमदाबादचे रहिवासी आहेत आणि एचसीपी नावाच्या बांधकाम कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1984 मध्ये गुजरातच्या सीईपीटीमधून आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केला, या संस्थेचे अध्यक्ष आणि MD म्हणून ते कार्यरत आहेत. बिमल यांनी 1988 मध्ये शहर नियोजनात पदव्युत्तर पदवी आणि 1995 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून शहर आणि प्रादेशिक नियोजनात पीएचडी मिळवली.
बिमल पटेल गेल्या 35 वर्षांपासून वास्तूकला, शहरी डीझाईन आणि शहरी नियोजन क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांना साल 2019 मध्ये वास्तूकला आणि योजना क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी अहमदाबादच्या The Entrepreneurship Development Institute चे सर्वप्रथम डीझाईन केले होते. त्यांना आगा खान अॅवार्ड फॉर आर्किटेक्चर (1992 ), युएन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्स अॅवार्ड ऑफ एक्सलन्स (1998 ), वर्ल्ड आर्किटेक्चर अॅवार्ड ( 2001 ) आणि पंतप्रधान नॅशनल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन अर्बन प्लानिंग अॅण्ड डीझाईन (2002) तसेच साल 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.