आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता दिल्लीसह इतर राज्यात पक्षाचा सुकाणू कोणाच्या हाती असेल, हा प्रश्न विचारला जात आहे. केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी सुनीता केजरीवाल या एक माजी आयआरएस अधिकारी आणि गृहिणी म्हणून ओळखल्या जात होत्या. पण आम आदमी पक्षासाठीच्या या संकट काळात त्यांनी निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसून येते. त्या अचानक सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतल्या. त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेची क्लिप आपच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. त्याची खूप चर्चा झाली. अरविंद केजरीवाल यांचे विरोधक पण हा दावा करत आहेत की ते, आता पक्षाचे नेतृत्व पत्नीच्या हाती सोपवू शकतात.
सुनीता केजरीवाल होतील CM
दिल्लीतील मुख्यमंत्री कार्यालयाचा रोख अत्यंत स्पष्ट आहे. दिल्ली सरकारच्या नेतृत्वात कोणताच बदल करण्यात येणार नाही, यावर ते ठाम आहेत. दिल्लीतील मंत्री आणि ज्येष्ठ आप नेता आतिशी यांनी, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री पदी राहतील असा विश्वास व्यक्त केला. आपने यापूर्वीच त्यांचे तुरुंगातील सरकारचे मॉडेल लागू केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सक्त वसुली संचालनालयाच्या कोठडीतून मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना निर्देश दिले आहेत. त्यांनी जलधोरणावर पहिला आदेश पण तुरुंगातूनच पाठवला. पण तरीही काही जण सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा करत आहेत.
अगोदरच ठरली रणनीती
आम आदमी पक्षाला ईडी एक ना एक दिवस अरविंद केजरीवाल यांना अटक करणार हे माहिती होते. त्यामुळे त्यांनी पक्षातील अनेकांवर अगोदरच जबाबदारी निश्चित केली होती. मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज, आपचे राज्यसभेतील खासदार संदीप पाठक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत सुनीता केजरीवाल यांना सार्वजनिक उपक्रमात आणि पत्रकार परिषदांमध्ये सक्रिय करण्याची भूमिका पण अगोदरच ठरली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भावनेला हात
अरविंद केजरीवाल यांची अटकेविरोधात आपने विरोध प्रदर्शन केले. हा मुद्दा भावनिक दृष्ट्या हाताळण्यात येत आहे. भाजप सरकार विरोधकांना कसा त्रास देत आहे, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. तर सुनीता केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल यांच्या रुपाने नागरिकांच्या भावनेलाच हात घालण्यात येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने झारखंडमध्ये हाच पॅटर्न राबविला आहे. कल्पना सोरेन यांनी भाजपवर मोठा पलटवार केला आहे.