नवी दिल्ली | भारतात बलात्काराचा (Rape) आरोप असलेला आणि सध्या फरार असलेला स्वामी नित्यानंद (Nityanand) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा आहे त्याच्या शिष्येची. स्वामी नित्यानंद याने कैलासा नामक एक काल्पनिक देश तयार केल्याचा दावा केला आहे. या देशाची राजदूत म्हणून नित्यानंद याची शिष्या विजयप्रिया हिने नुकताच संयुक्त राष्ट्र परिषदेत एंट्री घेतली. जिनिव्हा येथे झालेल्या या बैठकीत विजयप्रियाने स्वामी नित्यानंदावर भारत अन्याय करत असल्याची तक्रार केली आहे. या बैठकीला कैलासा देशाचे इतर प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. मात्र वेशभूषेमुळे विजयप्रिया अधिक चर्चेत आली आहे.
विजयप्रियाचा एक व्हिडिओ स्वामी नित्यानंदाने ट्विट केलाय. यात तिने भारतीय साध्वींसारखा वेश परिधान केलाय. भगवे वस्त्र, दाट केस अर्थात जटांची वेणी, कपाळावर उभं गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा वेशभूषेत विजयप्रियाने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत प्रवेश केला. तेव्हा ही नेमक्या कोणत्या देशाची प्रतिनिधी आहे, यावरून चर्चा झाली. नंतर नित्यानंदांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ टाकल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.
स्वामी नित्यानंदाने कैलासा नावाचा देश स्थापन केल्याचा दावा केला आहे. यासाठीची एक वेबसाइटदेखील त्याने तयार केली आहे. इक्वेडोरच्या किनारपट्टीवर हा देश असल्याचा दावा करण्यात आलाय. या देशाचा स्वतःचा पासपोर्ट, ध्वज आणि कैलासा रिझर्व्ह बँकदेखील असल्याचे म्हटले जाते. पृथ्वीवरील सर्वात मोठं हिंदू राष्ट्र अशी ओळख या देशाची सांगितली जाते. ज्यांना ज्यांना स्वतःच्या देशात हिंदू धर्माचं पालन करता येत नाही, अशा वंचित हिंदुंसाठी हा देश असल्याचं वेबसाइटवर म्हटलं गेलंय.
याच देशाची कायमस्वरुपी राजदूत म्हणून विजयप्रिया संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पोहोचली. तिच्यासह अन्य प्रतिनिधीही उपस्थित होते. स्थानिक कायद्यांमुळे भारतातील शेतकऱ्यांवरही अन्याय होत असल्याची तक्रार कैलासाच्या इतर प्रतिनिधींनी या बैठकीत केली.
A DELEGATION OF WOMEN FROM THE UNITED STATES OF KAILASA, WITH THE GRACIOUS BLESSINGS OF THE SUPREME PONTIFF OF HINDUISM (SPH) BHAGAVAN NITHYANANDA PARAMASHIVAM, PARTICIPATED IN DISCUSSIONS ON “THE EQUAL AND INCLUSIVE REPRESENTATION OF WOMEN IN DECISION-MAKING SYSTEMS.” pic.twitter.com/MzuY3l9c4y
— KAILASA’s SPH Nithyananda (@SriNithyananda) February 28, 2023
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील मणिनगरमध्ये नित्यानंदाचा आश्रम आ हे. या आश्रमातच मुलींना ओलीस ठेवण्याचे प्रकरण समोर आले होते. २०१९ मध्ये बंगळूरू येथील एका जोडप्याने नित्यानंद आणि आश्रमातील दोन संचालकांविरुद्ध मुलांचे अपहरण आणि त्यांना ओलीस ठेवण्याची तक्रार केली होती. या दाम्पत्याने त्यांची चार मुले आणि चार मुलींना बंगळुरू येथील आश्रमात सोडले होते, मात्र मुलींना अहमदाबाद येथील आश्रमात नेण्यात आल्याचं आणि त्यानंतर त्यांना भेटू दिलं जात नसल्याची तक्रार केली होती. पोलीस तपासानंतर दोन मुली मिळाल्या, मात्र उर्वरीत दोन मुली अजूनही नित्यानंदाच्या ताब्यात आहेत. नित्यानंद मात्र २०१९ पासून भारतातून फरार झाला आहे. संयुक्त राष्ट्रातील कैलासा देशाच्या प्रतिनिधींमुळे स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.