मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील लोनारा आणि मोथापुरा गावातील लोकांमध्ये केवळ 12 हजार रुपयांमुळे मोठा राडा झाला. या दोन गावातील लोकांनी एकमेकांच्या रक्ताचे पाट वाहिले. एका बाजूने लाठ्या तर दुसऱ्या बाजूने धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 8 जण रक्तबंबाळ झाले. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. जिल्हा मुख्यालयापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत.
मोथापुरा गावात, लोणारा आणि मोथापुरा गावातील नातेवाईक केवळ 12,000 रुपयांच्या व्यवहारावरून एकमेकांशी भिडले. यावेळी एका बाजूने नातेवाईकांनी लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 8 जण जखमी झाले. सर्व जखमींना 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात खरगोन येथे आणण्यात आले.
कौटुंबिक वादातून ही घटना घडली. मोथापुरा गावात राहणाऱ्या सीताराम याचा पुतण्या लोणारा गावात रहात आहे. या पुतण्याला सीतारामने 12 हजार रुपये उसने दिले होते. दिलेले उसने पैसे मागण्यासाठी सीताराम त्याच्या घरी गेला. पण तो घरे नसल्याने पुन्हा आपल्या गावी परतला होता.
पैसे मागण्यासाठी सीताराम घरी आल्याची माहिती पुतण्याच्या पत्नीने दिली. पैसे परत मागितल्याचा पुतण्याला राग आला. त्याने सोबत काही गावकऱ्यांना घेतले आणि सीतारामचे घर गाठले. आपल्यासोबत असलेल्या 10 ते 12 गावकऱ्यांसह त्याने सीताराम आणि त्याच्या कुटुंबावर लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
हा हल्ला झाल्यानंतर सीतारामचे गावकरीही एकत्र झाले. त्यांनी पुतण्यासोबत आलेल्या गावकऱ्यांवर हल्ला केला. याची माहिती पुतण्याच्या गावी कळताच तेथील गावकरीही चालून आले आणि दोन्ही गावकरी एकमेकांना भिडले.
या जबरी हल्यात एकूण आठ जण जखमी झाले असून यात काही महिलांचाही समावेश आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर, काही गावकऱ्यांना अटक केली. विशेष म्हणजे सर्व जखमी हे मोथापुरा गावचे आहेत. तर हल्लेखोर लोणारा गावचे रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्राप्त तक्रारीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.