नवी दिल्ली : लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असताना महाराष्ट्रातील खासदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर बोचरी टीका केली. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी संसदेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीवर टीका केली. या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी शिवसेनेच्या इतिहास वाचून दाखवला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना इशारा दिला.
“अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना मला असं वाटत होतं की मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्र विधानसभेत बसलो आहे. हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सांगत आहे. पण हा शिवसेनेत कधी आला. मी 1966 चा शिवसैनिक आहे. मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा 220 लोकांनी विरोध केला होता. आता काही लोकंच वाचले आहे. हे वाघ नाहीत तर मांजर आहेत. ते संपले आहेत. त्यांची पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही. तुम्ही जर आमचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोट जरी दाखवलं ना तर तुमची लायकी का आहे दाखवून देईन. “, असं जोरदार प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नारायण यांनी विरोधात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना दिलं.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला हनुमान चालिसेचा मुद्दा
खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीवर टीका केली. राज्यात हनुमान चालिसा म्हणण्यावर देखील बंदी होती असं त्यांनी सांगितलं. तसेच ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाही तुरुंगात टाकलं. पत्रकारांनाही तुरुंगात टाकण्याचं काम यांनी केल्याचं त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.