कॉलेज प्रशासनाचा हुकूमशाही कारभार ! विद्यार्थ्यांना फाटकी जीन्स घालून येण्यास केली मनाई, ॲफेडेव्हिटही मागितले

| Updated on: Aug 31, 2023 | 4:08 PM

एका कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी विशेष रुल्स , रेग्युलेशन्स जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये फाटकी जीन्स घालून येण्याची परवानगी नाही. यासंदर्भात त्यांच्याकडून ॲफेडेव्हिटचीही मागणी करण्यात आली आहे. कुठल्या कॉलेजमध्ये घडतोय हा प्रकार, पाहूया..

कॉलेज प्रशासनाचा हुकूमशाही कारभार ! विद्यार्थ्यांना फाटकी जीन्स घालून येण्यास केली मनाई, ॲफेडेव्हिटही मागितले
Image Credit source: freepik
Follow us on

कलकत्ता | 31 ऑगस्ट 2023 : पश्चिम बंगालच्या कलकत्त्यामधील (kolkata) आचार्य जगदीश चंद्र बोस कॉलेजमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींना फाटलेले किंवा असभ्य कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात कॉलेज व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापत्र / ॲफेडेव्हिटची (affidavit) जारी केले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यावर स्वाक्षरी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. कॉलेज व्यवस्थापनाने या प्रतिज्ञापत्रावर पालकांची स्वाक्षरी आणणेही बंधनकारक केले आहे.

मात्र काही विद्यार्थ्यांनी या गोष्टीला विरोधही दर्शवला आहे. मात्र कॉलेजमध्ये मॉरल पोलिसिंगसह शैक्षणिक वातावरण कायम राहावे, या उद्देशानेचा हा नियम लागू करण्यात आला आहे, असे कॉलेज प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. 7 ऑगस्टपासून नवे सत्र सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉलेज प्रशासनातर्फे तेथे प्रवेश घेणाऱ्या सर्व नवे आणि जुने विद्यार्थी तसेच कॉलेजमधील कर्मचाऱ्यांसाठी देखील काही नियम जारी केले आहेत.

यामध्ये मॉरल पुलिसिंगवर जोर देतानाच कॉलेज प्रशासनाने सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एक ॲफेडेव्हिट देण्यास सांगितले आहे. त्याचा मसुदाही कॉलेज प्रशासनातर्फेच तयार करण्यात आला आहे. ‘कॉलेज कॅम्पसमध्ये आम्ही कधीच फाटलेली किंवा असभ्य जीन्स घालून येणार नाही. आम्ही सदैव फॉर्मल कपडे घालून येऊ’ असे त्यामध्ये लिहीण्यात आले असून त्यावर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सही करण्यास सांगण्यात आले आहे.

मात्र या ॲफेडेव्हिटुमळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप दर्शवत हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. मात्र कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या सांगण्यानुसार, कॅम्पसमध्ये शैक्षणिक व्यवस्था कायम राखण्यासाठी हा नियम जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खराब होतंय कॅम्पसचे वातावरण

कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी अनेकदा फाटक्या जीन्समध्ये किंवा अस्ताव्यस्त कपड्यांमध्ये दिसतात. त्यामुळे कॅम्पसचे वातावरण बिघडते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन नियम लागू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही विद्यार्थ्याला असा ड्रेस घालून कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही असेही त्यानी स्पष्ट केले.
कोणीही या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.