भारतीय सैन्यातही तृतीयपंथीयांची भरती होणार ? अभ्यास गट केला स्थापन

| Updated on: Nov 16, 2023 | 6:07 PM

भारतीय सैन्यात ट्रान्सजेंडर किंवा तृतीय पंथीयांच्या भरतीचा विचार केला जाऊ शकतो. भारतीय सैन्यात तृतीय पंथीयांच्या भरतीचा अभ्यास करण्यासाठी एक स्टडी ग्रुप स्थापन केला आहे. हा अभ्यास गट हा भरतीचा सर्वांगिण अभ्यास करुन आपला अहवाल सरकारला देणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय केंद्र सरकर घेणार आहे.

भारतीय सैन्यातही तृतीयपंथीयांची भरती होणार ? अभ्यास गट केला स्थापन
transgender in army
Follow us on

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : तृतीय पंथीयांना नेहमीच थट्टा किंवा चेष्टामस्करीचा विषय म्हणून पाहीले जाते. अनेकदा त्यांना चिडविले जाते. परंतू लवकरच आता तृतीय पंथी भारतीय सैन्यात कदाचित तुम्हाला मोठ्या पदांवर देश सेवा करताना पाहायला मिळू शकतील. भारतीय सैन्यात लवकरच ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथीयांच्या भरतीसाठी चर्चा सुरु झाली आहे. जगातील अनेक देशांच्या सैन्य दलात ट्रान्सजेंडरची भरती केली जात आहे. त्यामुळे भारत देखील या प्रकरणात मोठा निर्णय घेऊ शकतो असे म्हटले जात आहे.

भारतीय सैन्यात ट्रान्सजेंडर किंवा तृतीय पंथीयांच्या भरतीचा विचार केला जाऊ शकतो. भारतीय सैन्यात तृतीय पंथीयांच्या भरतीचा अभ्यास करण्यासाठी एक स्टडी ग्रुप स्थापन केला आहे. जो या निर्णयाचा फायदा आणि तोट्याचा सर्वांगिण अभ्यास करणार आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह 19 देशांच्या सैन्यात ट्रान्सजेंडरची भरती केली जाते. नेदरलॅंड या देशाने साल 1974 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या सैन्यात ट्रान्सजेंडरची भरती केली होती.

इंडीयन एक्सप्रेसच्या बातमीनूसार भारतीय सैन्यात ट्रान्सजेंडरच्या भरतीचा विचार केला जात आहे. यासाठी खास अभ्यास गट तयार केला आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये ट्रान्सजेंडरची भरती कशी काय केली जाऊ शकते याचा अभ्यास हा गट करणार असून सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. वेळोवेळी या संदर्भात याआधीही सरकारने या पर्यायावर चर्चा केली आहे. जर तृतीय पंथीना सैन्यात प्रवेश मिळाला तर त्यांच्या प्रशिक्षणापासून ते सिलेक्शन पर्यंत कोणतीही सूट दिली जाणार नाही. तसेच वेगवेगळ्या पोस्टींगमध्येही कोणती सवलत दिली जाणार नाही.

काय असतील अडचणी

जर सरकारने असा निर्णय घेतला तर त्यात आव्हाने देखील अनेक असतील. जर असे झाले तर यास केवळ एक रोजगार मिळण्याचा एक मार्ग म्हणून यास पाहाता येणार नाही असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. येथे अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यांना राहण्यासाठी घर, टॉयलेट आणि वर्कींग पॅटर्न तयार करावा लागेल

केव्हा चर्चेत आले ?

भारतीय नौदलाने साबी गिरी उर्फ मनीष कुमार गिरी यांना साल 2017 मध्ये बडतर्फ केले होते. सुट्टीवर असताना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करताना त्यांनी लिंग परिवर्तनाची सर्जरी केली होती. त्यामुळे त्यांना थेट नोकरी गमवावी लागली होती. साल 2020 मध्ये बीएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबीने सहाय्यक कमांडेंट अधिकारी कॅडर पदावर ट्रान्सजेंडरची भरती करणार असल्याचे म्हटले होते. साल 2015 साली तामिळनाडू पोलिस दलात देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली. तर छत्तीसगढ पोलिस दल ट्रान्सजेंडर समाजाची सक्रीय भरती करणारे पहिले राज्य बनले.

सर्वात पहीली भरती नेदरलॅंडमध्ये

नेदरलॅंड आपल्या सैन्यात साल 1974 मध्ये ट्रान्सजेंडरची भरती करणारा जगातील पहिला देश बनला. त्यानंतर जगातील अनेक देशात तृतीयपंथीयांनी सैन्यात सामावले गेले. नेदरलॅंडनंतर 1976 मध्ये स्वीडनने, 1878 मध्ये डेन्मार्क, 1979 मध्ये नॉर्वे आणि त्यानंतर कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ही प्रथा सुरु झाली.