दिल्ली : बूस्टर डोसबाबत (booster dose) केंद्र सरकार (central government) ॲक्शन मोडमध्ये असून दोन्ही डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे. बूस्टर डोसबाबतच अंतर कमी केलं जाणार आहे. 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांपर्यंत अंतर केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. देशात कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकार हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय. 29 एप्रिलला नवी दिल्लीत याच पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर काल सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, हे स्पष्ट आहे की कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व रूपे कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. तर वयोगटानुसार सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे लवकरच केंद्र सरकार बूस्टर डोससंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दोन वर्षांतील कोरोनासंदर्भात आमची ही 24 वी बैठक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र आणि राज्यांनी ज्या प्रकारे एकत्र काम केले आणि ज्यांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मी सर्व कोरोना योद्ध्यांचे कौतुक करतो. गेल्या 2 आठवड्यांपासून वाढत्या कोरोना बाधीतांच्या संख्येमुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. आरोग्याच्या पायाभूत सुविधांपासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत कोरोनाशी संबंधित प्रत्येक बाबीमध्ये आवश्यक ते उपलब्ध करून देण्याचे काम देशाने 2 वर्षात केले आहे.
पात्र लाभार्थी https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉग इन करू शकतात किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. नोंदणी/साइन इन पूर्ण झाल्यानंतर, लाभार्थीचा ओळख पुरावा CoWin मुख्यपृष्ठावर नवीन श्रेणी अंतर्गत अद्ययावत करणे आवश्यक आहे. लाभार्थी त्यांचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र वापरून नोंदणी करू शकतात.
बूस्टर डोस कोविड-19 विरूद्ध चांगले संरक्षण देते. पहिला आणि दुसरा डोस देखील कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी आहे, परंतु कालांतराने ते कमी प्रभावी होऊ शकतात, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये. कोरोना व्हायरसचे नवनवीन प्रकार वेळोवेळी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, वाढीव डोस हे रोखण्यात मदत करू शकते. 2.4 कोटींहून अधिक बूस्टर डोस हेल्थकेअर, फ्रंटलाइन कामगार आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यात आले आहेत.