नवी दिल्ली | 28 February 2024 : सध्या भाजपचा विजयवारू उधळला आहे. आता तर भाजप 400 पारचा हुंकार भरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅटट्रिक होणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. पण आता दिल्ली ते गल्ली असा लढा देऊ. जिंकेपर्यंत लढण्याचा निर्धार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. देशातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क, TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला. लढा देण्याची सवय आहे. शुन्यातून इथपर्यंत मजल मारल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संसदच नाही तर रस्त्यावर सुद्धा लढाई सुरु ठेवण्याचा निश्चिय त्यांनी बोलून दाखवला.
आम्ही सत्ताधाऱ्यांच्या मनात नाही
देशातील सध्याच्या घडामोडीवर त्यांनी भाष्य केले. सत्ताधारी नेहमीच विरोधकांना पाण्यात पाहतात. ते त्यांना कायम विरोधक मानतात. आम्ही विरोधात आहोत. आम्ही नेहमी सत्ताधाऱ्यांच्या मुखात आहोत पण मनात नाही, असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला. मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना संसदेत बोलू दिल्या जात नाहीत. त्यांचे माईक बंद केले जातात, असा आरोप विरोधक कायम करतात.
असा उलगडला जीवन प्रवास
आपण अत्यंत शुन्यातून इथपर्यंत आलो आहे. कोणाची सहानुभूती नको आहे. पण आपण कायम संघर्षातून इथपर्यंतचा प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष 1947 मध्ये घराला लागलेल्या आगीत आई, बहिण, भाऊ, काका यांना गमावले. आपण एका धर्मशाळेबाहेर खेळत असल्याने आणि वडील शेतात काम करत असल्याने बचावलो. एक काका लष्कारात महार रजिमेंटमध्ये होते. ते पुण्यात असल्याने वडील पुण्याला आले. पण काका निवृत्ती घेत गुलबर्ग्याला गेल्याचे कळले. त्यांचे वडील गुलबर्ग्याला पोहचले. तिथे आठ दिवसांत टेक्सटाईल मिलमध्ये त्यांना नोकरी मिळाली. पुढे शिक्षण घेतानाच नेतृत्वाची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. 1969 मध्ये काँग्रेसमध्ये ब्लॉक अध्यक्ष पद मिळाले. टप्प्या टप्प्याने एक एक पद मिळाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये मोठी संधी मिळाली. त्यानंतर देशपातळीवर विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्या. मंत्री पद मिळाले. आता काँग्रेस अध्यक्ष पद मिळाले. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाची भूमिका मांडण्याची संधी मिळाली, हे सांगताना खरगे भावूक झाले.
रस्त्यावरची लढाई संसदेपर्यंत
आम्ही लढा देण्यासाठी कित्येकदा रस्त्यावर उतरलो. त्यामुळे कष्टाची, लढण्याची सवय पूर्वीपासूनच आहे. आम्ही लढ देणे थांबवले नाही. आम्ही संघर्ष पाहिला आहे. आम्हाला कोणाची सहानुभूती नको. आताही रस्त्यावर आणि संसदेत लढा देत राहू. जोपर्यंत जिंकत नाही. तोपर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा निर्धार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला.