नवी दिल्ली | 27 February 2024 : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या WITT सत्ता संमेलनात रामदेव बाबांनी अनेक विषयांवर बेधडक मते मांडली. त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला. राजकीय वाग्बाण पण सोडले. योगगुरु रामदेव बाबा यांनी काँग्रेसच्या काळात केलेले आंदोलन अनेकांच्या आठवणीत आहे. त्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक उत्पादन, विक्रीत घेतलेली अतुलनीय भरारी सर्वांनाच विस्मय करणारी आणि प्रेरणादायी आहे. सत्ता संमेलनात रामदेव बाबांनी राजकीय विचार मांडतानाच धार्मिक, राजकीय आणि बौद्धिक दहशतवादावर मन मोकळे केले. हिंदू राष्ट्राविषयीची भूमिका मांडली. काय म्हणाले बाबा रामदेव…
हिंदू राष्ट्रावर भूमिका
काही लोक एक खास प्रकारचे नॅरेटिव्ह रंगत असल्याचा आरोप रामदेव बाबांनी केला. आपण त्या वादात पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत पूर्वीपासूनच आध्यात्मिक देश राहिला आहे. भारत सनातन मानणारा देश आहे. हे तर कोणी नाकारू शकत नाही, असे ते म्हणाले. हिंदू राष्ट्र म्हणजे, मुस्लिम, ख्रिश्चन वा इतर धर्मियांना राष्ट्राबाहेर काढणे नाही. भारतात तर अनेक वर्षांपासून अनेक संस्कृती जोपासल्या गेल्या. बहरल्या. फुलल्या. इस्लामचे, ख्रिश्चनांचे वा जगभरातील सध्या ज्या काही विचार प्रक्रिया सुरु आहेत, त्यांचे मुळ भारत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू राष्ट्रासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी काही लोक उत्साहात अशा गोष्टी बोलून जातात. पण भारत एक पंथ निरपेक्ष राष्ट्र आहे. त्याची आत्मा ही सनातन आहे. त्याचे शरीर पंथ निरपेक्ष असल्याचे ते म्हणाले.
तो तर बौद्धिक दिवाळखोर
अनेक जण भारताला धर्म निरपेक्ष म्हणतात. पण ते लोक मूर्ख असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. त्यांनी धर्माची व्याख्या सादोहरण दिली. अग्नीचा धर्म हा उष्णता आहे. तसाच प्रत्येक वस्तूचा, व्यक्तीचा एक धर्म असतो. जो म्हणतो भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, समजून जा तो बौद्धिक दिवाळखोर आहे. भारत हा पंथ निरपेक्ष असल्याचे ते म्हणाले.
अनेक माफिया
देशात काही लोक धार्मिक, राजकीय आणि बौद्धिक दहशतवादी असल्याचा आरोप रामदेव बाबांनी केला. त्यांनी कोणावर निशाणा साधला हे त्यांनी सांगितले नाही. पण देशात अनेक क्षेत्रात माफिया घुसल्याचे ते म्हणाले. मी यापूर्वी पण देशात शिक्षण माफिया, आरोग्य क्षेत्रातील माफिया असल्याचे म्हटल्यावर अनेकांनी माझ्यावर टीका केल्याचे ते म्हणाले.