चीनशी झुकून चर्चा होणार नाही, देशाचं मस्तक कधीच झुकू देणार नाही; राजनाथ सिंह यांनी ठणकावलं

| Updated on: Feb 27, 2024 | 12:28 PM

What India Thinks Today | पाकिस्ताननंतर चीनने देशाची डोकेदुखी वाढवली आहे. चीनची विस्तारवादी भूमिका जगाची डोकेदुखी ठरली आहे आणि त्याचा परिणाम चीनला चांगलेच भोगावे लागत आहे. चीनविषयी देशातून, विरोधी गोटातून अनेक आरोपांची राळ उठली तर अफवांचे पेव फुटले आहेत, देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या मंचावरुन संरक्षण मंत्र्यांनी असे ठणकावले.

चीनशी झुकून चर्चा होणार नाही, देशाचं मस्तक कधीच झुकू देणार नाही; राजनाथ सिंह यांनी ठणकावलं
Follow us on

नवी दिल्ली | 27 February 2024 : पाकिस्ताननंतर चीनसोबत भारताचे संबंध ताणल्या गेले आहेत. गलवान घाटीतील घटनाक्रमानंतर दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. चीन वादग्रस्त भागात बांधकाम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून कायम करण्यात येत आहे. चीन संबंधावरुन विरोधी गटातून आरोपांची राळ उठविण्यात आली आहे. तर अफवांचा बाजार पण तेजीत आहे. अशावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना करारा जवाब दिला आहे. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या मंचावरुन त्यांनी चीनशी झुकून चर्चा होणार नाही असे ठणकावले.

झुकून चर्चा नाहीच

चीनसोबत चांगली चर्चा सुरू आहे. चिंतेचं कारण नाही. सार्वजनिकरित्या काही गोष्टी स्पष्ट केल्या जात नाही. झुकून चर्चा केली जात नाही, एवढं समजून जा. देशाचं मस्तक कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकू देणार नाही. पण चर्चा सुरू आहे. ते चर्चेला तयार आहेत. म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही कमजोर आहोत असं नाही. आता समजून जा काही ना काही आहे. ते काय आहे हे सांगणार नाही, असे त्यांनी रोखठोकपणे सांगितले.

हे सुद्धा वाचा

आरोपांवर बेधडक उत्तर

भारताच्या जमिनीवर चीनने कंन्स्ट्रक्शन कधी केलंय केव्हा केलंय मला माहीत नाही. ते राहुल गांधी यांनाच माहीत असेल. आपल्या सैन्याच्या पराक्रमावर त्यांनी शंका उपस्थित करू नये. देशाचं मस्तक कधीच झुकू देणार नाही, याबाबत राहुल गांधी यांनी आश्वस्त राहावं. त्यांच्या जमिनीवर ते बांधकाम करत असेल तर आम्ही का रोखावं, असा सवाल त्यांनी केला.

पीओकेची चिंता वाहू नका

पीओकेची चिंता करू नका. तिथले लोकच भारतात येण्याची मागणी करतील. दीड वर्षापूर्वी काश्मीर व्हॅलीत माझा कार्यक्रम होता. तेव्हाच मी त्यांना संबोधित केलं होतं. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे लोक भारतात यायला उत्सुक होतील, असं मी म्हटलं होतं. पुढे काय होतं ते पाहा, असे ते म्हणाले. शांततेच्या काळात कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या सैन्याला तयार राहिलं पाहिजे. कुणावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर आपल्या संरक्षणासाठी, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिवचणार नाही, पण सोडणार पण नाही

आम्ही कुणाला डिवचणार नाही, आम्हाला डिवचलं तर आम्ही सोडणार नाही. ही आमची नीती आहे. जगातला भारत एकमेव देश आहे, ज्याने कधी कुठल्या देशावर आक्रमण केलं नाही. किंवा कुठल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केला नाही. भारतावर याबाबत कुणी बोट ठेवू शकत नाही, असा घणाघात त्यांनी केला.