भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार यावरुन पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पक्षाचा गाडा हाकण्यात येत आहे. त्यांना या पदासाठी वाढीव मुदत मिळाली आहे. नड्डा यांच्याच नावाची काही जण चर्चा करत आहेत. तर महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. अर्थात त्यांनी त्याला नकार दिला आहे. या सर्व गोंधळात एक मोठी बातमी येऊन ठेपली आहे. हे वृत्त जर खरं ठरलं तर भाजपचे नारी शक्तीला मोठे नमन ठरणार आहे.
कमान महिलेच्या हाती?
भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janata Party) राष्ट्रीय अध्यक्ष (National President) जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहर उमटली नाही. या मुद्यावर भाजपची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. लोकसभेतील नाराजी पाहता, भाजपने अध्यक्ष पदासाठी नवीन खेळी खेळल्याची चर्चा आहे. पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलेच्या हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात अधिकृतपणे कोणतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
एका वृत्तानुसार, संरक्षण मंत्री राजना सिंह यांच्या घरी ही बैठक बऱ्याच वेळ सुरु होती. ही बैठक जवळपास 5 तास चालल्याचे बोललं जातं आहे. या बैठकीत नवीन अध्यक्षाच्या नावावर बराच खल झाला. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महासचिव बी. एल. संतोष , संघाचे कार्यवाह दत्तात्रय होसबाळे आणि संयुक्त सह सरकार्यवाह अरुण कुमार यांचा सहभाग होता.
तळागाळातील कार्यकर्त्याचा शोध
या वृत्तानुसार, भाजपला पुढील अध्यक्षपदासाठी संघाच्या सहमतीची गरज आहे. अनेक मोठ्या नेत्यांना भाजपने विविध महत्वाच्या पदावर स्थान दिले आहे. त्यामुळे आता भाजप आणि संघ अध्यक्षपदासाठी तळागाळाशी नाळ असलेल्या नेत्याच्या शोधात आहे. अर्थात अजून याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी महिला अथवा ओबीसी यांच्या हातात पक्षाची कमान देण्याचा प्रयत्न राहील. भाजपने अद्याप पक्षाची कमान महिलेच्या हाती दिलेली नाही.
देवेंद्र फडणवीस होतील अध्यक्ष?
भाजपचे पुढील अध्यक्षांच्या शर्यतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. फडणवीस अथवा भाजप यांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. उलट ही मीडियातील चर्चा असून ती विरोधकांनी पेरलेली बातमी आहे, असा दावा पण करण्यात येत आहे. संघ आणि भाजपमध्ये झालेल्या बैठकीत बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली.