आशिया बी मरणानंतरही निवडणूक जिंकल्या, कुठे घडला हा चमत्कार

| Updated on: May 17, 2023 | 6:46 PM

स्थानिक निवासी मोहम्मद जाकीर यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की आशिया बी यांनी अनेकांना आपल्या स्वभावाने जिंकले होते. त्यांना दिलेले आश्वासन मतदारांना तोडायचे नव्हते.

आशिया बी मरणानंतरही निवडणूक जिंकल्या, कुठे घडला हा चमत्कार
Image Credit source: socialmedia
Follow us on

लखनऊ : अनेकजण आपल्या आयुष्यात दुसऱ्यांना मदत करण्यात, दुसऱ्यांच्या मदतीला धावण्यात आपले संपूर्ण आयुष्य खर्च करतात. त्यामुळे लोक त्यांच्या जाण्यानंतरही त्यांना कायम आठवणीत ठेवत असतात. उत्तर प्रदेशातील एका स्थानिक पालिका निवडणुकीत आशिया बी नावाच्या महिला उमेदवार त्यांच्या मृत्यूच्या दोन आठवड्यानंतर आश्चर्यकारकरित्या निवडणूक जिंकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार या आपल्या लाडक्या उमेदवार महिलेला मतदारांनी निवडून एक प्रकारची श्रद्धांजलीच अर्पण केली आहे.

पहिल्यांदाच पालिकेची निवडणूक लढविणाऱ्या 30 वर्षीय आशिया बी उत्तर प्रदेशच्या पालिका निवडणुकीची धामधूमी सुरू असताना अचानक आजारी पडल्या. त्यांना फुप्फुसाचा आणि पोटाचा संसर्ग झाल्याने त्यांचा अस्कमात मृत्यू झाला. मतदानाच्या 12 दिवसांपूर्वीच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आशिया बी यांना सुमारे 44 टक्के मते मिळून त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया रोखणे कठीण

आशिया यांच्या अशा प्रकारे अचानक झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीने निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचित केले होते. परंतू जिल्हा अधिकारी भगवान शरण यांनी मंगळवारी सांगितले की मतपत्रिकेवरून त्यांचे नाव हटविणे प्रक्रीया खूप पुढे गेल्याने आयत्यावेळी शक्य झाले नाही. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने तिला रोखता येत नसल्याने हे नाव वगळण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मृत्यूपूर्वी आशिया यांनी केलेल्या कामाची पोहच पावती म्हणून मतदारांनी मग आपल्या मताधिकाराचा वापर करून त्यांना निवडून आणण्याचा चंगच बांधला.

मतांनी श्रद्धांजली वाहीली

स्थानिक निवासी मोहम्मद जाकीर यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की आशिया बी यांनी अनेकांना आपल्या स्वभावाने जिंकले होते. त्यांना दिलेले आश्वासन मतदारांना तोडायचे नव्हते, म्हणूनच लोकांनी त्यांना मृत्यूपश्चातही भरघोस मतांनी निवडून आणले आहे. आशिया यांचे पती मुंतजीम कुरेशी यांनी म्हटले आहे की आशिया बी हीने आपल्या शांत स्वभावाने सर्वांचे मन जिंकले होते. तर तेथील एका स्थानिक मतदार आरिफ यांनी म्हटले आहे की आमचे मत त्यांच्या साठी एक श्रद्धांजली होते.