नवी दिल्ली : महिला दिनाच्या (Women’s Day) एक दिवस आधीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. आयोगाच्या सदस्या, दाक्षिणात्य अभिनेत्री, भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी हा खुलासा केलाय. मी 8 वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी मी कोणत्या मनःस्थितीत होते, याची आता कल्पनाही करू शकत नाही. आईला सांगावं तर आई विश्वास ठेवणार नाही, अशी भीती सतत वाटायची, असा गौप्यस्फोट खुशबु सुंदर यांनी केला आहे.
खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीदरम्यान, खासगी आयुष्यातील घटनांचा खुलासा केला. मी आठ वर्षांची असल्यापासून वडिलांनी माझं लैंगिक शोषण करणं सुरु केलं होतं. पत्नीला, मुलांना मारणं आणि मुलींचं लैंगिक शोषण करणं हा जणू आपला अधिकारच आहे, असं त्यांना वाटायचं. पण अशा घटना मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या असतात. माझ्या आईने सर्वात अपमानास्पद वैवाहिक जीवन जगलं. मी 8 ते 15 वर्षांपर्यंत त्यांचे अत्याचार सहन केले. १५ व्या वर्षी त्यांच्याविरोधात बोलण्याचा धडस माझ्यात आलं. पण आई विश्वास ठेवेल की नाही, अशी शंका होती. अखेर मी बोलले. पण या घटनेनंतर वडिलांचं निधन झालं. त्यावेळी घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती.. असा प्रसंग खुशबू सुंदर यांनी सांगितला.
I thank our H’ble PM @narendramodi ji and the government of India for entrusting me with such a huge responsibility. I shall strive hard to protect, preserve & nourish Nari Shakthi which is growing leaps & bounds under your leadership. Looking forward eagerly. #JaiHind@NCWIndia pic.twitter.com/Tm5GTJPEDe
— KhushbuSundar (@khushsundar) February 27, 2023
खुशबू सुंदर या एक दाक्षिणात्य सिने अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट द बर्निंग ट्रेनमधून एका बाल कलाकाराच्या भूमिकेतून चित्रपटांतील कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं. त्यात नसीब, लावारिस, कालिया, दर्द का रिश्ता आणि बेमिसाल यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अनेक तेलगु, कन्नड, मल्याळम चित्रपटांतूनही भूमिका केली. १९८५ मध्ये त्यांनी जॅकी श्रॉफसोबत जानू चित्रपटात अभिनय केला होता.
खुशबू सुंदर यांनी २०१० मध्ये राजकारणात प्रवेश केला. करुणानिधी यांच्या उपस्थितीत त्यांनी डीएमकेत प्रवेश केला. २०१४ पर्यंत त्या डीएमके यांच्या पक्षात होत्या. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव पडल्याने त्यानी भाजपात प्रवेश घेतला.
काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने खुशबू सुंदर यांना राष्ट्रीय महिला आय़ोगाच्या सदस्यपदी नियुक्त केलं. खुशबू या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत आहेत. खुशबू सुंदर यांचा एक मोठा चाहता वर्ग भारतात विशेषतः दक्षिण भारतात आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं मंदिरदेखील बांधलंय.