दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणात अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ED) 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयने त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. आता केजरीवाल यांना तुरुंगातूनच दिल्ली राज्याचा कारभार हाकू द्या अशी विंनती करणारी याचिका हायकोर्टात सादर करण्यात आली आहे. एका वकिलाने ही याचिका सादर केली आहे. कोर्ट या याचिकेवर सुनावणी घेणार की नाही, हे समोर आलेले नाही.
दिल्ली हायकोर्टातील वकील श्रीकांत प्रसाद यांनी ही याचिका सादर केली आहे. तिहार तुरुंग प्रशासनाला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्याची विनंती प्रसाद यांनी याचिकेद्वारे केली आहे. याचिकेनुसार, आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा देण्याची विनंती करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे याचिकेत
श्रीकांत प्रसाद यांनी याचिकेत म्हटल्यानुसार, दिल्लीतील सध्याची परिस्थिती ही घटनेच्या 21,14 आणि 19 अंतर्गत नागरिकांचे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. गेल्या 7 वर्षांपासून दिल्लीतील आरोग्य आणि शैक्षणिक दर्जा खूप सुधरला आहे. देशातील कोणता पण कायदा एखाद्या मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला त्याचे काम करण्यापासून रोखू शकत नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे. याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
जामीनासाठी गोड पदार्थ
दरम्यान ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत. केजरीवाल यांना त्यांच्या घरून डबा येतो त्यात आंबे, मिठाई हे जेवण दिलं जात आहे. केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांनी गोड खाऊ नये हे सांगितल असतानाही ते हे पदार्थ खात आहेत.केजरीवाल हे जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत की यांच्या आधारे ते मेडिकल कारणासाठी जामीन मागू शकतात असा दावा ED ने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. ED च्या दाव्या नंतर हायकोर्टाने तिहार जेल प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे.