मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ( ODI World Cup 2023 ) ची सुरुवात गुरुवारपासून झालेली आहे, परंतू क्रिकेटचे चाहत्यांना 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या मॅचची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अहमदाबादला जाणाऱ्या सर्व विमानांचे तिकीट फुल्ल झाली आहेत. जी काही विमाने शिल्लक आहेत त्याचे तिकीट दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे स्पेशल वंदेभारत एक्सप्रेस ( Vande Bharat Express ) चालविणार आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहाता यावी यासाठी चाहत्यांसाठी स्पेशल वंदेभारत एक्सप्रेस चालविण्याची योजना भारतीय रेल्वेने आखली आहे. देशभरातील क्रिकेट चाहते गुजरातच्या अहमदाबाद येथे येण्यासाठी उतावीळ झाले आहेत, त्यासाठी अहमदाबाद येथील सर्व हॉटेलांचे बुकींग आणि विमानाच्या तिकीटांचे बुकींग केव्हाच फुल झाले आहे. मॅचच्या तारखेला विमानाच्या तिकीटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याने चाहत्यांच्यासाठी या विशेष वंदेभारत एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार गुजरातच्या शेजारील मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यातून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमला जाण्यासाठी स्पेशल वंदेभारत मॅचच्या वेळेनूसार सुटणार आहेत. म्हणजेच मॅच सुरु होण्याच्या काही तास आधी या ट्रेन अहमदाबादला पोहचतील आणि मॅच संपल्यानंतर परतीच्या ट्रेनही उपलब्ध असतील. त्यामुळे चाहत्यांचा हॉटेलमध्ये मुक्काक करण्याचा खर्च वाचणार आहे.
अहमदाबाद आणि साबरमती स्थानकाजवळून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडीयमला पोहचणे सोपे असल्याने या वंदेभारत एक्सप्रेस या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत. या ट्रेनच्या वेळा अशा असतील की मॅच सुरु होण्याच्या काही वेळ आधी या ट्रेन येथे पोहचतील आणि मॅच संपल्यावर चाहत्यांच्या परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असतील.
रेल्वे प्रवाशांचा प्रवास सार्थक करण्यासाठी या वंदेभारत ट्रेनमध्ये देशभक्तीपर गीते ऐकायला मिळतील. तसेच या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्याची क्षणचित्रे स्क्रीनवर दाखविण्यात येतील. भारत-पाक क्रिकेट सामन्याची तिकीटे ऑनलाईन उपलब्ध होताच संपली आहेत. ही मॅच पहाण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि बॉलिवूड तारे देखील येण्याची शक्यता आहे.