मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : आता रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास घडविण्यासाठी भारतीय रेल्वे सतत प्रयत्न करीत आहे. रेल्वे लवकरच लांबपल्ल्याच्या ट्रेनचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि सिंगल यंत्रणेचे आधुनिकीकरण करीत आहे. रेल्वे आता मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील तेजस एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेसची वेग दर ताशी 160 किमी होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर मार्च महीन्यांपासून ही सेवा सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहीती दिली आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद मार्गाचे आधुनिकीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. प्रमुख कामे पूर्ण झाली असून मार्चपासून या मार्गावरील ट्रेनच्या वेगात वाढ होणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले. सुरुवातीला केवळ तेजस, शताब्दी आणि वंदेभारत सारख्या प्रिमियम दर्जाच्या ट्रेनचा वेग वाढणार आहे. या ट्रेनचा वेग दर ताशी 160 किमी होणार आहे. त्यानंतर एलएचबी डब्यांच्या ट्रेन या वेगाने चालविले जाणार असल्याचे नीरज वर्मा यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनमधून सरासरी 170 लांबपल्ल्याच्या ट्रेन धावतात. ज्यात 120 लांबपल्ल्याच्या ट्रेन एलएचबी या आधुनिक डब्यांनी सुसज्ज आहेत.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गांवरील ट्रेनचा वेग वाढल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या वेळेत सरासरी 30 मिनिटांची बचत होण्याची आशा आहे. सध्या लांबपल्ल्याच्या ट्रेन मुंबई सेंट्रल ते बोरीवली पर्यंत दर ताशी 100 किमीच्या वेगाने तर बोरीवली ते विरारपर्यंत 110 किमी वेगाने तर विरार ते अहमदाबाद दरम्यान 130 किमी वेगाने चालविण्यात येतात. मार्चपासून वाढलेला वेगाचा फायदा विरारपासून पुढे लागू होणार असल्याचे नीरज वर्मा यांनी सांगितले.