नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंचे चाललेल्या आंदोलनावरुन आता जोरदार आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत. त्यातच आज बजरंग पुनिया यांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कोणत्याही प्रकारचे ‘डील’ झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुनिया यांनी सांगितले की, ब्रिजभूषण सिंग यांना अटक का करण्यात आली नाही, अशी विचारणा आम्ही बैठकीत केल्यानंतर त्याबाबतचा तपास सुरु असल्याच गृहमंत्र्यांनी सांगितले होते असंही यावेळी सांगण्यात आले.
तर अमित शाहांसोबतच्या बैठकीची बाहेर चर्चा करू नये असंही सरकारकडून सांगण्यात आले होते. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत आमची कोणत्याही प्रकारची सेटिंगही झाली नाही.
त्यामुळे आंदोलनाद्वारे आमचा विरोध सुरूच राहील असंही त्यांनी सांगितले आहे. मात्र आता या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार याबाबत आम्ही विचार करणार असून सध्या सोशल मीडियावर मात्र अनेक अफवा पसरवल्या जात आहेत असंही पुनियांनी सांगितले
पुनिया यांनी सांगितले की, सरकारच्या वक्तव्याशी कोणत्याही प्रकारे आम्ही सहमत नाही. तर दुसरीकडे सरकारही आमच्या मागण्या मान्य करत नाही. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुस्तीपटूंची शनिवारी गृहमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, रात्री अकरा वाजता सुरु झालेली बैठक तासभर चाललेली होती.
या बैठकीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट आणि सत्यव्रत कादियान या उपस्थित होत्या. या बैठकीत कुस्तीपटूंनी WFI अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. तर त्याचवेळी नोकरी सोडण्याच्या प्रश्नावर बजरंग पुनिया यांनी सांगितले की, मला रेल्वेतील नोकरीची चिंता नाही. मी रजा घेतली आहे.
तर सुट्टी संपल्यानंतर आम्ही सह्या करुन आलो आहे. तसेच जे कुणी मला नोकरीची धमकी देत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की या सगळ्यांपेक्षा माझी नोकरी मोठी नाही.
कारण ब्रिजभूषणवर एका अल्पवयीनीसह 7 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.त्यामुळे आम्ही आंदोलनासाठी कोणत्याही पातळीवर तडजोड स्वीकारल्या तयार नाही असंही पुनिया यांनी स्पष्ट केले.