“ब्रिजभूषण सिंह यांच्यासह त्यांच्या साथीदारांवरही आता कारवाई”; सगळ्या कामांना स्थगितीचे आदेश

| Updated on: May 14, 2023 | 1:00 AM

बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यासह त्यांच्या साथीदारांवरही आता कारवाई; सगळ्या कामांना स्थगितीचे आदेश
Follow us on

नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे आता कुस्ती महासंघालाचा दणका देण्यात आला आहे. खेळाडूंच्या आंदोलनामुळे भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व अधिकाऱ्यांची आता कामं आता थांबवण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने सध्याच्या अधिकाऱ्यांना महासंघाच्या निवडणुकीपूर्वी कोणत्याही प्रकारचे निर्णय किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी, आयओएने फेडरेशनचे दैनंदिन काम पाहण्यासाठी आणि आगामी निवडणुका आयोजित करण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन केली होती, ती समितीच महासंघाच्या जबाबदाऱ्या पाहणार आहे.

जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदाच देशातील ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेत्या कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता.

त्यानंतरच क्रीडा मंत्रालय आणि ऑलिम्पिक संघटनेकडून स्वतंत्र चौकशी आणि समितीही स्थापन केली होती. त्यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांना तपास पूर्ण होईपर्यंत फेडरेशनच्या कामापासून लांब राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

गेल्या महिन्यात ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलन सुरू केले. त्यामुळे आता क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानुसार ऑलिम्पिक संघटनेने चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडे कामकाज हाताळण्याची आणि निवडणुका घेण्याची जबाबदारीही देण्यात आली होती.

आता ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाला थेट पत्र लिहून आदेश दिला आहे की, सरचिटणीसांसह कोणताही अधिकारी, ज्यांचा कार्यकाळ संपत आहे, तो कोणत्याही प्रशासकीय किंवा आर्थिक बाबींमध्ये सहभागी होणार नाही आणि त्यांच्या कामाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली जातील असंही त्यांनी याबाबत सांगितले आहे.

जी समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीला आता 45 दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

त्यांच्या तक्रारीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गेल्या महिन्यातच दोन एफआयआरही नोंदवले आहेत. नुकतेच यापैकी एका प्रकरणात एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूचाही जबाब दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.