नवी दिल्ली : देशातल्या कोणत्याही रेल्वे (Railway) स्टेशनवर गेल्यावर यात्रीगण, कृपया ध्यान दे… हा आवाज आपलं लक्ष वेधून घेतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या उद्धोषणेकडे आकर्षित होत असतात. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी या आवाजाची नक्कलही करून पाहिली असेल. तर अनेकांना एकदा तरी आपण रेल्वे स्टेशनच्या कार्यालयात जाऊन अशा प्रकारची घोषणा द्यावी, अशी इच्छा असते. अनेक वर्षांपासून देशातील रेल्वे स्टेशनवर घुमणारा आवाज एकच आहे की वेगवेगळा आहे… की हा रेकॉर्ड करून ठेवलाय, असे अनेक प्रश्न मनात असतात. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने या प्रश्नांची नुकतीच उत्तरं दिली आहेत. यातून एका व्यक्तीच्या कौशल्याची नव्याने प्रशंसा होतेय.
हा आवाज आहे सरला चौधरी यांचा. ही कहाणी सुरु होते 1982 मध्ये. सरला चौधरी यांनी रेल्वे विभागातील उद्घोषक अर्थात अनाऊंसरसाठी अर्ज भरला होता. सरला चौधरी यांच्यासोबत अनेकांनी या पदासाठी अर्ज केला होता. या सर्वांतून सरला चौधरी यांची निवड झाली. मात्र त्यांना टेंपररी अर्थात अस्थायी नोकरी मिळाली.
Did You Know?
कृप्या ध्यान दीजिए!
Remember the voice that echoes in our minds while recalling our train journey?
This distinctively unique voice belongs to Smt. Sarala Chaudhary, a proud member of the Railway family. pic.twitter.com/9DjEC92bQf
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 26, 2023
सरला चौधरी नोकरीवर रुजू झाल्या. हळू हळू अधिकाऱ्यांना कळलं की, सरला यांचा आवाज अत्यंत प्रभावी आहे. प्रवासी त्यांच्या घोषणेकडे कान देऊन ऐकत आहेत. हे पाहून सरला यांना १९८६ मध्ये कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात आलं.
आता प्रश्न येतो की सध्या रेल्वे स्टेशनवर ऐकू येतो तो आवाजही सरला यांचाच आहे का? तर याचं उत्तर होय आहे. 2015 मध्ये रेल्वे स्टेशनवरील अनाउंसमेंट्स पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आल्या. संगणकीकृत करतानाच सरला चौधरी यांचाच आवाज वापरण्यात आला. अर्थात घोषणा सुरु झाल्यावर नव्या ट्रेनची नावं सांगताना काही इतर उद्घोषकांचा आवाज जोडण्यात आलाय. मात्र सुरुवातीला यात्रीगण कृपया ध्यान दे..या घोषणेपासून इतर अनेक शब्द सरला यांचेच वापरले जातात.
अगदी सुरुवातीला विविध रेल्वे स्टेशनवरील माहिती पाहून अनाउंसमेंट करणं सरला चौधरी यांच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती. अनेक भाषांमध्ये त्या रेकॉर्ड कराव्या लागत होत्या. त्याननंतर रेल्वेने घोषणांची जबाबदारी रेल्वे व्यवस्थापन प्रणालीकडे सोपवली.